
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाने सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जगदीश दीपक लाडी या मुख्य आरोपीविरुद्ध चारकोप पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या जगदीशला चारकोप पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जगदीशने आतापर्यंत अनेकांना गुंतवणुक करण्यास भाग पाडून त्यांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
२४ वर्षांचा तक्रारदार तरुण कांदिवलीत फिटनेस सेंटरमध्ये ट्रेनर आहे. जिममध्ये महिलेला ट्रेनिंग देताना तिच्याकडून जगदीशविषयी माहिती मिळाली. जगदीश बीटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास २५ टक्के व्याजासह पैसे परत करेल, असे त्याला समजले. जगदीशची भेट घेतल्यानंतर त्याने १ लाख ६५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र वारंवार विचारणा करूनही जगदीशने व्याज आणि मुद्दल देण्यास टाळाटाळ केली. जगदीशने अशाचप्रकारे आतापर्यंत अनेक जणांची १ कोटी ५५ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.