मुंबई : सध्या ऑनलाईन फसवणूक वाढीस लागली आहे. ओटीपी मागण्यापासून डेबिट, क्रेडिट कार्ड बनावट बनवण्यापर्यंत सर्व प्रकारची ऑनलाईन फसवणूक चालत असते. आता मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्याचीच ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या अधिकाऱ्याची ४.४९ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर असलेले अधिकारी मलबार पोलीस ठाण्यात तैनात आहेत. गेल्या आठवड्यात ११ नोव्हेंबरला त्यांना डेबिट कार्ड मिळाले. त्यानंतर त्यांना अनोळखी क्रमांकावरून मोबाईल आला. मी तुमच्या बँकेतून बोलत आहे. तुमचे डेबिट कार्ड आले आहे. या कार्डचे पिन सेटअप करून देण्यासाठी फोन केला आहे. त्यानंतर आरोपीच्या मोबाईल क्रमांकावर त्याने एक फाइल पाठवली.
या फाइलचे नाव ‘ओपन (बँकेचे नाव) होते. त्यांनी त्याच्यावर क्लिक केले. त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना सर्व वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितली. त्यानंतर पॅनकार्ड क्रमांक, डेबिट कार्ड क्रमांक व कार्ड संपण्याची तारीख टाकायला सांगितले. त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्याच्या मोबाईलवर अनेक मेसेज आले. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या दुसऱ्या खात्याची माहिती मागितली. तेव्हा मला संशय आला, तुला माझ्या बँक खात्याची माहिती काय करायची आहे, असा प्रश्न मी त्याला विचारला. तेव्हा त्याने मला कारण सांगितले. मी जेव्हा जोरजोराने हसायला लागलो. कॉल हँग केला. त्यानंतर कॉल बंद केला. त्यावेळी माझ्या खात्यातून १,९७,८५० रुपये, १९५० रुपये, ५७ हजार असे एकूण ४,४९,८५० माझ्या खात्यातून गेल्याचे निष्पन्न झाले. माझ्या खात्यात केवळ ८६९ रुपये शिल्लक होते. त्यानंतर मी तत्काळ सायबर क्राईम पोर्टलवर व काळा चौकी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवली आहे.