पोलिसांना यापुढे बेस्ट बसचा मोफत प्रवास बंद करण्यात येणार

१ जूनपासून अंमलबजावणी होण्याची शक्यता
पोलिसांना यापुढे बेस्ट बसचा मोफत प्रवास बंद करण्यात येणार

पोलिसांना यापुढे बेस्ट बसचा मोफत प्रवास बंद करण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने तसे पत्र पोलीस आयुक्तांना दिले असून याबाबत १ जूनपासून अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांना बेस्ट बसने प्रवास करताना तिकिट काढणे बंधनकारक होणार आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाच्या निर्णयामुळे ४० हजारांहून अधिक पोलिसांचा मोफत बेस्ट प्रवास बंद होणार आहे.

मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. कर्तव्यावर हजर होताना, घरी जाताना किंवा अन्य काही कामासाठी बेस्टच्या बसमधून प्रवास करण्यासाठी पोलिसांना मोफत पास दिला जात होता. पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे मोफत पास देऊ नयेत, असे मुंबई पोलिसांनी बेस्ट प्रशासनाला कळवले आहे. या निर्णयामुळे पोलिस दलामध्ये नाराजीचे चित्र असल्याचे समोर आले आहे.

या पासांबाबत बेस्ट प्रशासनाने बिले पाठविल्यानंतर पोलीस दलाकडून ही रक्कम अदा केली जात होती. मात्र १ जूनपासून ही कार्यपद्धत बंद करण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतला आहे. मुंबईतील पोलिसांना दैनंदिन कामकाजासाठी वाहने देण्यात आली आहेत. दरम्यान, याबाबत बेस्ट उपक्रमाची मत जाणून घेण्यासाठी महाव्यवस्थापकांना फोन केला असता ते फोनवर उपलब्ध झाले नाही.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in