१२ लाख लाभार्थ्यांवर मोफत उपचार!

ऑक्टोबरपर्यंत आपला दवाखान्याची संख्या २५०; १४७ मोफत चाचण्या
१२ लाख लाभार्थ्यांवर मोफत उपचार!

मुंबई : फिजिओथेरपी, नेत्ररोग, रक्त चाचण्या अशा विविध १४७ प्रकारच्या चाचण्या ‘आपला दवाखान्या’त मोफत करण्यात येतात. ऑक्टोबर २०२२ ते रविवार ९ जुलैपर्यंत १२ लाखांहून अधिक लोकांवर आपला दवाखान्यात मोफत उपचार करण्यात आले आहेत. ‘घराजवळ दवाखाना’ या संकल्पनेवर आधारित ऑक्टोबर २०२३ पर्यंत आपला दवाखान्यांची संख्या २५० वर नेण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची सुरुवात १७ नोव्हेंबर २०२२ मध्ये करण्यात आली. सध्या १६४ आपला दवाखाना मुंबईकरांच्या सेवेत असून ऑक्टोबर २०२३ पर्यंत २५०च्या वर आपला दवाखान्यांची संख्या असेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबईभरातील विशेषत: झोपडपट्टी भागात सुरू केलेल्या ‘आपला दवाखाना’ सुविधेमुळे छोट्या आजारांसाठी थेट पालिकेच्या मोठ्या रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांची संख्या घटल्याने मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी झाला आहे. शिवाय मोठे आजार असल्यास ‘आपला दवाखाना’मधील डॉक्टरांकडून मोठ्या रुग्णालयात जाण्याच्या सूचना देण्यात येत असल्यामुळेही फायदा होत आहे. शिवाय दवाखाना घराजवळच असल्याने लवकर उपचार होत असल्याने आजार बळावण्यापासून रोखला जात असल्यामुळेही फायदा होत आहे. त्यामुळे ‘आपला दवाखाना’ सुविधेची संख्या वाढवण्यात येणार आहे.

रात्री १० पर्यंत सुविधा
‘आपला दवाखाना’च्या ठिकाणी पालिकेकडून खासगी आणि नामांकित प्रयोगशाळांशी करार करून विविध प्रकारच्या १४७ चाचण्या मोफत केल्या जात आहेत. ही आरोग्य केंद्रे रात्री १० वाजेपर्यंत सुरू असल्यामुळे कामावरून उशिरा घरी येणाऱ्या सर्वसामान्यांनाही मोठा फायदा होत आहे. तापासारख्या सर्वसामान्य आजारांसह दंत चिकित्सा, स्त्री रोगतज्ज्ञ, बाल रोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचा रोग अशा आजारांवर तज्ज्ञांकडून उपचार केले जात आहे.

डॉक्टर, कर्मचाऱ्यांना सौजन्याचे धडे
‘आपला दवाखाना’सह पालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी सौजन्याने वागावे, यासाठी त्यांना सौजन्याचे धडे दिले जाणार आहेत. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्ससोबत करार करण्यात आला आहे. यामुळे एकंदर आरोग्य व्यवस्थेचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in