
मुंबई : मुंबईतील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, भविष्यात पाण्याची पाण्याची गरज वाढणार हे निश्चित. पिण्याच्या पाण्याचे नवीन स्त्रोत तूर्तास उपलब्ध होत नसल्याने समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मात्र प्रकल्पाचे काम सुरू होण्याआधीच प्रकल्प खर्च ३,५०० हून ८,५०० कोटींवर गेला आहे. दरम्यान, प्रकल्पाचा खर्च आहे तितकाच आहे, परंतु प्रकल्पाची पुढील २० वर्षे देखभाल करणे, प्रचलन करणे आणि जीएसटी व अन्य करापोटी खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.
मुंबईकरांची रोजची तहान भागवण्यासाठी दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून वातावरणीय बदलामुळे पाऊस लहरी झाला असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवताच, मुंबईत पाणीबाणी परिस्थिती निर्माण होते. मुंबईत पाणीबाणी परिस्थिती निर्माण होऊ नये आणि पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. बोरीवली पश्चिम येथील मनोरी समुद्र किनाऱ्याजवळ १२ हेक्टर जागेत हा प्रकल्प उभारला जाणार आहे. दररोज ४०० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात २०० दशलक्ष लिटरचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे पालिका मुंबईसाठी पाण्याचे नवे स्रोत शोधत होती. मनोरी येथे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला असून या प्रकल्पाची मूळ किंमत ३५०० कोटी आहे. मात्र वाढती महागाई, जीएसटी व अन्य कर यामुळे प्रकल्प खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता साडेआठ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे.