काँग्रेसचा आघाडी सरकारला पूर्ण पाठिंबा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र या संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली नाही.
काँग्रेसचा आघाडी सरकारला पूर्ण पाठिंबा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

स्वत:चेच आमदार एकापाठोपाठ एक साथ सोडून जात असताना शिवसेनेला महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांनी मात्र मदतीचा हात कायम ठेवला आहे. काँग्रेसचा आघाडी सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. स्वत:च्याच पक्षात एका बाजूला अभूतपूर्व दुफळी माजलेली असताना कधी काळी कट्टर विरोधक असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र या संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली नाही.

संजय राऊत यांच्या विधानानंतर आघाडीत त्याची प्रतिक्रिया काय उमटणार, याचे औत्सुक्य होते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक दुपारी पार पडली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती देताना सांगितले, ‘‘संजय राऊत यांचे विधान हे त्यांच्या पक्षांतर्गत स्थितीला अनुसरून करण्यात आले आहे. काँग्रेस पूर्णपणे महाविकास आघाडीसोबतच आहे. आघाडी सरकार आपली पाच वर्षे पूर्ण करणार आहे. सरकार कोणत्याही प्रकारे अल्पमतात आलेले नाही. तसे वाटत असेल तर भाजपने सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणून दाखवावा. भाजप का चूपचाप आहे, असा सवालही पटोले यांनी केला.

अजित पवार निधी देत नाहीत

उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला विकासनिधी देत नाहीत, असा आरोप शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील याचा पुनरूच्चार केला आहे. अजित पवार आपल्याला निधी देत नाहीत, अशा तक्रारी काँग्रेसच्याही आमदारांनी माझ्याकडे केली होती. त्यानंतर आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच अजित पवार यांची भेट घेऊन ही नाराजी त्यांच्या कानावर घातली होती, असेही नाना पटोले म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in