
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस पुन्हा एकदा त्यांची चौकशी करणार आहेत. गुणरत्न सदावर्ते अटकेत असताना त्यांच्याविरोधात गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये अनेक तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यामुळे गावदेवी पोलीस सदावर्तेंची पुन्हा एकदा चौकशी करणार आहेत. पोलिसांनी सदावर्ते यांना ११० अंतर्गत नोटीसदेखील पाठवली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्तेंना अटक करण्यात आली होती. याप्रकरणात त्यांना जवळपास १६ दिवस जेलमध्ये राहावे लागले. त्यानंतर जामीन मिळाल्यानंतर त्यांची जेलमधून सुटका झाली. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी एसटी कष्टकरी जनसंघ ही नवी संघटना स्थापन करून सक्रिय राजकारणाच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. नव्या संघटनेची घोषणा करुन ४८ तासही उलटले नाहीत, तोपर्यंत त्यांना पोलिसांची नवी नोटीस आली आहे. त्यामुळे सदावर्ते पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या कारवाईला
घाबरणार नाही - सदावर्ते
पोलिसांच्या नोटिशीवर प्रतिक्रिया देताना सदावर्ते म्हणाले की, “सत्तेचा कितीही दुरुपयोग करा, जय श्रीराम म्हणणारे आणि जय भीम म्हणणारे आम्ही तुम्हाला घाबरणार नाही. डंके की चोट पर उत्तर देऊ.”