मुंबई : दरवर्षी दिवाळीपूर्वी काही दिवस आधी कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा केली जाते. या पार्श्वभूमीवर विविध कामगार संघटनांकडून बोनसची मागणी केली जाते. यंदाही पालिकेच्या कामगार, कर्मचाऱ्यांना २० टक्के सानुग्रह अनुदान (बोनस) मिळावा यासाठी पालिका कामगार, कर्मचारी समन्वय समितीने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. जाहीर करण्यात येणाऱ्या बोनसच्या रकमेतून आयकर व इतर कर कापण्यात येऊ नये असेही पत्रात समितीने नमूद केले असल्याचे समन्सवय समितीचे बाबा कदम, महाबळ शेट्टी, सत्यवान जावकर यांनी सांगितले.
हे सानुग्रह अनुदान (बोनस) दिवाळी सणासाठी दिली जाते; मात्र जाहीर करण्यात येणाऱ्या बोनसच्या रकमेतून आयकर व इतर कर कापण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या हातात शिल्लक राहत नाही. त्यामुळे कापण्याची गरजच असेल, तर दिवाळी नंतरच्या पुढील महिन्यांत पगारातून ही रक्कम कापून घ्यावी, असे असेही समितीने पत्रात नमूद केले असल्याचे बाबा कदम, महाबळ शेट्टी, सत्यवान जावकर यांनी सांगितले.
मागील वर्षी २० हजार रुपये बोनस
मागील वर्षी २०२१-२२ मध्ये पालिकेच्या कायम कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये बोनस देण्यात आला होता, तर अनुदान प्राप्त खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पालिका प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकांना आणि अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना बोनस देण्यात आला होता. तसेच आरोग्य सेविकांना भाऊबीज म्हणून देण्यात आले होते. यंदा समन्वय समितीने २० टक्के सानुग्रह अनुदान (बोनस) मागणी केली आहे.