
मुंबई : मध्य रेल्वेवरील पुणे-मुंबई उद्यान एक्सप्रेसमध्ये महिलेचा विनयभंग करून तिच्याकडील रोख रक्कम पळवून नेत तिला एक्स्प्रेसमधून ढकलून देण्याची घटना अत्यंत धक्कादायक आहे. यावेळी त्या महिलेचा विनयभंग करणारा आरोपी मनोज चौधरीला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी पोलीस विभागाने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
रविवार ६ ऑगस्ट रोजी दादर स्थानकात पुणे-मुंबई उद्यान एक्स्प्रेसमध्ये महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडल्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुंबईच्या लोहमार्ग पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. “आरोपीविरोधात सबळ पुरावे मिळवून चांगले विधीतज्ज्ञ उपलब्ध करून दयावेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दयावे. जखमी महिलेवर वैद्यकीय उपचार व समुपदेशन करण्यात यावे तसेच पीडित महिलेचा मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव तत्काळ मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे पाठवावा. आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी कनिष्ठ अधिकाऱ्यास वैयक्तिक मार्गदर्शन करावे,” अशा मागण्या गोऱ्हे यांनी या पत्राद्वारे केल्या आहेत.
पीडित महिलेला दिला धीर
दरम्यान, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडित महिलेशी दूरध्वनीवरून संपर्क साधत तिला धीर दिला. तसेच चांगला सरकारी वकील मिळवून देणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. महिलेचे संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असून गोऱ्हे यांनी कुटुंबीयांशीही बोलून त्यांना लढा देण्याचा पाठिंबा दिला.