
मुंबई: गावदेवी येथील एका नामांकित बँकेच्या लॉकरमधून सुमारे बारा लाखांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरुन गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. मिता हर्ष संपत ही महिला अंधेरीतील एमआयडीसी परिसरात राहते. लग्नानंतर ती तिच्या गावदेवी येथील पेडर रोडवरील फ्लॅटमध्ये राहत होते. यावेळी तिने भुलाभाई देसाई रोडवरील एका बँकेतील लॉकरमध्ये कुटुंबियांचे सुमारे बारा लाखांचे दागिने ठेवले होते. वर्षांतून ती एकदा बँकेत जाऊन दागिन्यांची पाहणी करत होती. १४ जानेवारी २०२० रोजी ती बँकेत गेली होती. यावेळी बँकेतील लॉकरची तपासणी केल्यानंतर त्यात तिचे सर्व दागिने सुरक्षित होते. कोरोनानंतर ती बँकेत गेली नव्हती. गेल्या वर्षी जून महिन्यांत ती बँकेत गेली होती. यावेळी बँकेतील विद्युत पुरवठा बंद झाल्यानंतर तिथे प्रचंड अंधार झाला होता. त्यामुळे घाईघाईने लॉकर बंद करुन ती तेथून निघून गेली होती. १२ ऑगस्टला तिला बँकेतून एक मॅसेज आला होता. त्यात बँक दुसर्या ठिकाणी शिफ्ट होत असून तुमचे लॉकर लवकर खाली करा असे नमूद केले होते. त्यामुळे ती १७ ऑगस्टला बँकेत गेली होती. यावेळी तिने लॉकर उघडला असता तिचे दागिन्यासह इतर मुद्देमाल नसल्याचे दिसून आले. तिने हा प्रकार तिच्या मुलासह बँकेच्या अधिकार्यांना सांगितला. मात्र बँक अधिकार्यांनी त्यांचे काही ऐकून घेतले नाही. दागिने गहाळ झाले याला बँक जबाबदार नसल्याचे सांगून त्यांनी त्यांना पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. त्यानंतर तिने गावदेवी पोलिसात बँकेच्या लॉकरमधून सुमारे बारा लाखांचे दागिने आणि इतर मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविला आहे.