
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात झाली. रविवारी दुपारपासून बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या. दुपारी ३ वाजेपर्यंत ३,९३४ घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. दीड दिवसाच्या बाप्पाला गुरुवारी निरोप दिला होता. यंदा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यास गणेशभक्तांची पसंती दिसून आली.
गणेशोत्सव म्हणजे जल्लोष, आनंद. बाप्पाच्या आगमनापासूनच भक्तिमय वातावरणनिर्मिती होते. गणेश चतुर्थीला आगमन झाल्यानंतर बाप्पा गणेशभक्तांकडे पाहुणचार घेतो. गुरुवारी गणेश चतुर्थीला आगमन झाल्यानंतर दीड दिवस पाहुणचार घेतलेल्या लाडक्या बाप्पाने निरोप घेतला, तर रविवारी पाच दिवस पाहुणचार घेतलेल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोलताशांच्या गजरात गणरायाचे विर्सजन करण्यात आले. विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी पालिकेने नियोजनबद्ध व्यवस्था केली आहे. पालिकेने विभागवार तयार केलेल्या कृत्रिम तलावात भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. यंदा होणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेने गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहूसह समुद्रकिनाऱ्यासह आरे कॉलनी इतर ठिकाणच्या तलावावर विसर्जनाच्या सुविधेवर जास्त लक्ष दिलेले आहे. यात समुद्र, खाडीच्या ठिकाणी जीवरक्षक, मोटारबोट, नियंत्रण कक्ष, मोबाइल टॉयलेट, निरीक्षण मनोरे, वैद्यकीय मदत, विद्युत व्यवस्था, रुग्णवाहिका, काही ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रे आदी सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
उंच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी क्रेनची व्यवस्थाही करण्यात आली आहे. घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या गणपतीचे चौपाटी आणि तलाव येथे विसर्जन करण्यासाठी व्यवस्था केली आहे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. मुंबई पालिकेनेही जय्यत तयारी केली. चौपाटी आणि कृत्रिम तलाव येथे विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमुख विसर्जनस्थळी २११ स्वागतकक्षांची स्थापना करण्यात आली आहे, तसेच यासाठी तब्बल १० हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. रुग्णवाहिका, शासकीय आणि निमशासकीय वाहने मात्र नियमितपणे रस्त्यावर धावत होती. अवजड वाहनांना मात्र प्रवेश देण्यात येणार नसल्याच्या सूचना मुंबई वाहतूक पोलिसांकडून आधीच दिलेल्या होत्या.