
गेल्या काही वर्षांपासून लोकशाहीचा चौथा स्तंभ असले पत्रकार मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कोरोना काळात कर्त्यव्य निभावत असताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला, मात्र त्यातील अनेकांना अद्याप सरकारी मदत मिळालेली नाही. पत्रकरांना कोविड योद्धा दर्जा मिळावा, यासाठी आम्ही विधिमंडळातही आवाज उठवला आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पत्रकारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी केला.
इंडियन जर्नालिस्ट यूनियन या देशव्यापी पत्रकार संघटनेच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र स्टेट यूनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट या संघटनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन रविवारी दादर पूर्व मुंबई येथील कोहिनूर हॉल येथे पार पडले.
यावेळी प्रवीण दरेकर यांच्यासह इंडियन जर्नलिस्ट यूनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष के. श्रीनिवास रेड्डी, सरचिटणीस बलविंदर सिंग जम्मू, सचिव नरेंद्र रेड्डी, माजी प्रेस कौन्सिल सदस्य एम. ए. मजीद, तेलंगणा सरचिटणीस विराट आली, नवी मुबंई तेलगू कला समितीचे एम. कोंडारेड्डी, आत्मनिर्भर भारतचे रणजित चतुर्वेदी, राजगिरी फाउंडेशनचे अशोक राजगिरी, ईटीव्ही भारत ब्युरो चीफ सुरेश ठमके आदी मान्यवरांसह महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते .
“काही पत्रकारही आता एकांगी भूमिका घेऊ लागले आहेत. मात्र लोकशाहीचा हा चौथा स्तंभ असून त्यांनी कुणा एकाची बाजू न घेता सर्वसमावेशक विचार करून आपली भूमिका निष्पक्षपातीपणे मांडायला हवी. कोरोनात बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने भरीव मदत द्यायला हवी,” अशी मागणी दरेकर यांनी यावेळी केली.