
गेले काही महिने एसटी कर्मचाऱ्यांचे जोरदार आंदोलन सुरु आहे. २ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडलेला असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. एसटी महामंडळाच्या तब्बल ८८ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्याचा पगार अजूनही झालेला नाही. अशामध्ये आता पुन्हा एकदा त्यांच्या मागणीसाठी वकील गुणरत्न सदावर्ते आक्रमक झाले असून त्यांनी राज्य सरकरला आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, "राज्य सरकारने लवकरात लवकर अधिकारी कर्मचाऱ्यांचा पगार काढावा" अशी मागणी त्यांनी केली आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, "एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना आम्ही कामगारांना होणाऱ्या त्रासाबद्दलची माहिती दिली. पगार उशिरा काढण्यासाठी जे अधिकारी जबाबदार असतील, त्यांच्याविरोधात कारवाईची मागणीही आम्ही केली आहे. तसेच न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल याचिकाही दाखल करत आहोत. काऊंटडाऊन सुरू झाले आहे, लवकर पगार करा, नाहीतर जबाबदार अधिकाऱ्यांना श्रद्धेय देवेंद्रजीही वाचवणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे." असे ते म्हणाले.