
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तानमध्ये गुटख्याचा कारखाना सुरू करून देण्यात मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्यात आलेल्या गोवा गुटख्याचा मालक जगदीशप्रसाद मोहनलाल जोशी उर्फ जे. एम. जोशीला सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी या प्रकरणात सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवून १० वर्षांच्या तुरुंगवासाची ठोठावलेल्या शिक्षेला स्थगिती देतानाच एक लाखाचा जामीन मंजूर केला.
दाऊदने २००२मध्ये पाकिस्तानमध्ये गुटखा उत्पादन स्थापन करण्यासाठी दोन्ही गुटखा मालकांकडे मदत मागितली होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, उत्पादन कंपनीला फायर गुटखा कंपनी असे संबोधले जाणार होते. त्यावेळी जोशी यांनी कथितपणे जबाबदारी घेऊन प्लांट कार्यान्वित करण्यासाठी यंत्रसामग्रीमार्फत मदत करून कथितरित्या २.६४ लाख रुपये किंमतीची पाच मशीन दुबईमार्गे पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप जोशी यांच्यावर ठेवण्यात आला होता.
जानेवारी २०२३ मध्ये विशेष मोक्का न्यायालयाने गोवा गुटखा व्यापारी जे. एम. जोशी यांच्यासह आरोपी जमिरुद्दीन अन्सारी आणि फारुख अन्सारी उर्फ फारुख तालका या तिघांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कायद्यातंर्गत दोषी ठरवून १० वर्षांची शिक्षा आणि पाच लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणाी जोशी यांच्यासह माणिकचंद गुटखा मालक रायकलाल धारिवाल यांनाही आरोपी करण्यात आले होते. मात्र खटला न्यायालयात प्रलंबित असताना त्यांचे निधन झाले.
मोका न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जोशी यांच्या वतीने अॅड. आबाद पोंडा आणि अॅड. सुभाष जाधव यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल करताना जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनवणी झाली. न्यायालयाने सोमवारी जोशी याला १ लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करताना मोक्का न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला स्थगिती दिली