गटारी जोशात...कोंबड्या, माशांवर आडवा ताव

रविवारी लोकांनी मांसाहार व मद्यपानाचा आनंद घेतला
गटारी जोशात...कोंबड्या, माशांवर आडवा ताव

मुंबई : सोमवारी दीप अमावास्या किंवा गटारी अमावास्या आहे. पण, सोमवार असल्याने रविवारीच घराघरात गटारी अमावास्या जोशात साजरी झाली. चिकन, मटण, अंडी, मासे, कोलंबी, खेकडे यांच्या जोडीला मद्य प्राशन करून गटारीचा आनंद लुटण्यात आला.

यंदा दोन महिने श्रावण आहे. त्यामुळे दोन महिने मासे खायला मिळणार नसल्याने रविवारी फक्कड बेत करायचे घरोघरी ठरले. सकाळीच सकाळी मटणाच्या दुकानावर खिमा, कलेजी, मटण, वजरी आदींसाठी

रांगा लागल्या होत्या. पापलेट, झिंगा, कर्ली, बांगडा, सुरमई, ओला जवळा, रावस, खेकडे, कोलंबी घ्यायला एकच गर्दी होती. या जोडीला मद्याच्या दुकानातही गर्दी होती.

गटारी हा शब्द केवळ तुम्हाला महाराष्ट्रातच ऐकायला मिळेल. मुंबईत मोठ्या प्रमाणावर मिल कामगार कोकणातील व सातारा-कराड भागातील होते. श्रावण महिन्यापूर्वी स्थानिक भंडारी समाजाचे लोक स्थानिक मद्य बनवून त्याचे प्राशन करत असत. त्यावेळी गटारीच्या दुसऱ्या दिवशी कामगार रस्त्यावर झोपत असत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मिलना सुट्टी असे, अशी माहिती अरविंद परब यांनी दिली.

गटारी अमावस्येनिमित्त चिकन, मटण, मासे, कोलंबी, खीमा, अंडी यांच्यावर घराघरात ताव मारण्यात आला. दोन महिन्यांचा श्रावणाचा ‘मांसा’हाराचा उपवास असल्याने आजच मोठ्या प्रमाणावर मांसाहाराचे सेवन करण्यात आले.

‘गटारी’बाबत कुंदन आगासकर यांनी सांगितले की, आम्ही पाठारे प्रभू. माझ्या लहानपणापासून श्रावण अत्यंत भक्तीभावाने पाळतो. त्यामुळे रविवारी मांसाहारावर ताव मारला. आम्ही इराणी कॅफेमध्ये जाऊन खीमा पावावर आडवा हात मारला. श्रावणात आम्ही दिवसातून दोनवेळाच जेवणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

श्रावणात अनेकजण मांसाहार व मद्यपान वर्ज्य करतात. तसेच श्रावणात अनेकजण उपवासही करतात. यंदा अमावास्या १७ जुलै रोजी आहे. तत्पूर्वीच्या रविवारी लोकांनी मांसाहार व मद्यपानाचा आनंद घेतला.

ही सोमवती अमावास्या किंवा दीप अमवास्या ही पारंपरिक पद्धतीने काही जण साजरी करतात. ही अमवास्या रविवारी रात्री १० ते सोमवारी रात्रीपर्यंत असेल. या दीप अमावास्येला रात्री दिवे पेटवले जातात, असे विलेपार्ले येथील रहिवासी विजय नायकुडे यांनी सांगितले.

जेजुरीला या वेळी जत्रा भरते. श्रावण ते नवरात्रीपर्यंत विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, असे गिरीश वालावलकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in