प्रदूषणाची पातळी खालावली की वाढली? सफर, एमपीसीबीच्या नोंदीची क्रास चेक करणार -अश्विनी जोशी

सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करून ते पाण्याने धुवून काढण्याची कामे वेगाने केली जात आहेत.
प्रदूषणाची पातळी खालावली की वाढली? सफर, एमपीसीबीच्या नोंदीची क्रास चेक करणार -अश्विनी जोशी

मुंबई : मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली असून प्रदूषणाची पातळी खालावली की वाढली, यासाठी ‘सफर’ संस्था व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होणाऱ्या नोंदीची क्रॉस चेक करण्यात येत असल्याचे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले. दरम्यान, धुळीचे कण पसरण्यास कारणीभूत असलेल्या ७०० हून अधिक बांधकामांना नोटीस बजावण्यात आली असून एक हजारांहून अधिक बांधकाम ठिकाणी झाडाझडती घेतल्याचे अश्विनी जोशी यांनी सांगितले.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालावली असून प्रदूषणात वाढ होत आहे. प्रदूषणात वाढ होण्यास बांधकामे कारणीभूत असून याठिकाणी ३० फूट उंच भिंत, स्प्रिकलर बसवणे, इमारतींच्या बाह्य भागावर धूळरोधक पडदे (डस्ट स्क्रिन) लावणे, धूळरोधक पडद्यावर व मोकळ्या जागेत पाणी शिंपडणे अशी नियमावली २३ ऑक्टोबर रोजी जारी केली आहे. मात्र नियमावली जारी केल्यानंतर ही बांधकाम ठिकाणी नियमावलीचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर बांधकाम ठिकाणी झाडाझडती सुरु केली आहे. बांधकाम ठिकाणी नियमावलीचे पालन होत नसल्यास नियमावलीची अंमलबजावणी करा, अशी नोटीस बजावण्यात येत आहे. मात्र नोटीस बजावल्यानंतर ही नियमावलीचे पालन होत नसल्याने ७०० हून अधिक बांधकामांना नोटीस बजावण्यात आल्याचे अश्विनी जोशी यांनी सांगितले. दरम्यान, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली असून मार्चपर्यंत बांधकाम ठिकाणी तपासणी करण्यात येईल, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

कुलाबा येथे सफर संस्थेच्या वतीने प्रदूषणाची नोंद करण्यात येते, याठिकाणी सफर संस्थेने घेतलेल्या नोंदीची आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेल्या नोंदीची क्रास चेक करण्यात आले आहे.

धुळीचे कण पसरू नये, यासाठी रस्त्यांवर पाण्याची फवारणी करण्यात येत आहे. आतापर्यंत १५४ किमी लांब रस्त्यांवर पाण्याची फवारणी करण्यात आली असून दररोज पाण्याचा मारा करण्यात येत आहे. एकूण ६५० किलोमीटर लांब रस्त्यावर पाण्याची फवारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करून ते पाण्याने धुवून काढण्याची कामे वेगाने केली जात आहेत. एकूण ३५७ रस्ते व ६५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा त्यात समावेश आहे. याकरिता दैनंदिन एकूण १२१ टँकरद्वारे पाणी फवारणी केली जात आहे. महानगरपालिकेच्या स्लज डिवॉटरींग (१७), फायरेक्स टँकर (७), सूक्ष्मजल फवारणी यंत्र (५) मिस्ट ब्लोविग यांचादेखील वापर केला जात आहे. या कार्यवाहीसाठी विविध पुनर्वापर प्रक्रियेद्वारे उपलब्ध तसेच स्थानिक जलस्रोत जसे की तलाव, विहिरी, कूपनलिका यामधून उपलब्ध पाण्याचा वापर करण्यात येत आहे.

उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांची नजर

बांधकाम ठिकाणी नियमावलीचे पालन होते की नाही, याची तपासणी करण्यासाठी प्रत्येक विभागात पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. तसेच उपायुक्त व सहाय्यक आयुक्त प्रत्यक्ष बांधकाम ठिकाणी पाहणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in