
मुंबई : कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने बुधवारी मुंबई महापालिकेच्या उपायुक्त संगीता हसनाळे, उद्धव ठाकरे शिवसेनेच नेते सूरज चव्हाण यांच्यासह पाच खासगी कंत्राटदारांवर छापे टाकले.
ईडीच्या अधिकार्यांनी खालील ठिकाणी शोध घेतला: वैष्णवी किचन/सह्याद्री रिफ्रेशमेंट, परळ, एफएनजे एंटरप्रायझेस, जे पर्शियन दरबार हॉटेल, गोरेगाव चालवते, चेंबूरमधील सुश्री हसनाळे यांचे निवासस्थान, स्नेहा केटरर्स आणि डेकोरेटर्स, मुलुंड, गोल्डन स्टार हॉल आणि बँक्वेट, एम. फायर फायटर एंटरप्रायझेस, गोवंडी आणि वेस्टर्न इंडिया लॉजिस्टिक, चेंबूर.
कोविड साथीच्या काळात स्थलांतरित मजुरांसाठी खिचडी तयार करण्यासाठी आरोपींनी केलेल्या करारात ६.७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ईडीने संबंधितांवर केला आहे. त्याचा तपास मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. त्या पार्श्वभूमीवर ईडीने प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यातील तरतुदींनुसार आपला अहवाल सादर केला आहे. कोट्यवधी रुपयांच्या खिचडी घोटाळ्यात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि इतर सहा जणांविरुद्ध गुन्हाही नोंद झाला आहे.
खिचडी घोटाळ्यात सुजित पाटकर यांनी सल्लागार सेवा देण्यासाठी सह्याद्री रिफ्रेशमेंट्सकडून ४५ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल यांच्या खात्यावर ५३ लाख रुपये आणि सूरज चव्हाण यांच्या खात्यावर ३७ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेला या नेत्यांनी आरोपी खासगी फर्मला त्यांच्या राजकीय प्रभावातून खिचडी वितरणाचे कंत्राट मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा संशय आहे.
हसनाळे या नियोजन विभागात होत्या, परंतु कथितरित्या खासगी कंत्राटदार कंपन्यांची क्षमता तपासल्याशिवाय, त्यांनी आरोपी फर्म कंत्राटदारांना कंत्राट दिले, असे ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासानुसार हसनाळे यांनी कदम यांच्या अर्जावर वैष्णवी किचन/सह्याद्री रिफ्रेशमेंट्सला कंत्राट दिले. करारानुसार, प्रत्येक पाकिटात ३०० ग्रॅम खिचडी असायला हवी होती, परंतु परप्रांतीयांमध्ये वाटण्यात आलेल्या पाकिटांमध्ये केवळ १०० ते २०० ग्रॅमच खिचडी होती. कदम यांनी दुसऱ्या पक्षाला कामाचे उपकंत्राटही दिले.