मुंबई : कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांच्या सत्र न्यायालयात सात महिने प्रलंबित असलेल्या जामीन अर्जाच्या सुनावणीला अखेर मुहूर्त सापडला आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम.जी देशपांडे यांनी आजची सुनावणी तहकूब करताना ८ नोव्हेंबरला ईडी आणि मुश्रीफ यांच्या वकिलांना, अंतिम युक्तिवाद करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
ईडीने हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध आर्थिक अफरातफरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर छापेमारी केली. या अनुषंगाने ईडीकडून निष्कारण अटक केली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करीत हसन मुश्रीफ यांचे मुलगे नाविद, आबिद आणि साजिद यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात मार्च महिन्यामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यांच्या अर्जांवर गुरुवारी न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. गेली सात महिने न्यायालयालयात प्रलंबित असलेल्या या अर्जांची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. ईडी आणि मुश्रीफ यांच्या वकिलांना, अंतिम युक्तिवाद करण्याचे स्पष्ट निर्देश अर्जाची सुनावणी ८ नोव्हेंबरला निश्चित केली.
गेल्या सात महिन्यांत २१ वेळा सुनावणी तहकूब
-यापूर्वी न्यायालयाने विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांचा जामीन फेटाळून लावला. त्यानंतर उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिलास देत कठोर कारवाई न करण्याचे निर्देश ईडीला दिले आहेत, तर जामीन अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
विशेष पीएमएलएने मुश्रीफ यांचे चार्टर अकांउटंट महेश गुरव यांना नुकताच झटका देत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आता न्यायालयाने मुलांच्या अटकपूर्व जामिनावर काय निर्णय देते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.