मुसळधार पावसाचा उपनगरीय रेल्वे सेवांना फटका, ५० हून अधिक लोकलसेवा विस्कळीत

बहुतांश लोकलसेवा अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकात खोळंबून राहावे लागले. तर काही प्रवाशांनी पुन्हा माघारी परतणे पसंत केले
मुसळधार पावसाचा उपनगरीय रेल्वे सेवांना फटका, ५० हून अधिक लोकलसेवा विस्कळीत

मागील दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहरात देखील पावसाने जोरदार बॅटिंग करत जनजीवन विस्कळीत केले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलला बसत असून या दोन दिवसात ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत जवळपास ५० हून अधिक लोकलसेवा पावसामुळे विस्कळीत झाल्याचे रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. परिणामी बहुतांश लोकल फेऱ्या विलंबाने तर काही रद्द करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसल्याने निश्चित स्थळी पोहचण्यासाठी प्रवाशांना मोठी सर्कस करावी लागली. दरम्यान शुक्रवारी देखील पावसाने बरसणे सुरूच ठेवल्याने मध्य-पश्चिम रेल्वेवरील लोकल तब्बल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होत्या.    

मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली असली तरी पावसाच्या माऱ्यापुढे अवघ्या काही दिवसातच विविध कारणांनी रेल्वे सेवा विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शुक्रवारी १ जुलै रोजी सकाळी देखील हीच परिस्थिती राहिल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु होती. तर बहुतांश लोकलसेवा अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकात खोळंबून राहावे लागले. तर काही प्रवाशांनी पुन्हा माघारी परतणे पसंत केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in