कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या

हत्येच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या

कौटुंबिक वादातून एका ४८ वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने दगडाचा पाटा डोक्यात घालून हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा मालाडच्या मालवणी परिसरात घडली. मृत महिलेचे नाव विजयमाला ज्ञानोबा बलाडे असून तिच्या हत्येनंतर आरोपी पती ज्ञानोबा बलाडे यांनी मालवणी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले होते. हत्येच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजता मालाड येथील मालवणीतील गेट क्रमांक आठ, यशोदय सहकारी सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीमध्ये विजयमाला ही तिचा पती ज्ञानोबा बलाडे याच्यासोबत राहत होती. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होता. त्यातून त्यांच्यात सतत खटके उडत होते. शुक्रवारी तो तिच्या बाजूला झोपण्यासाठी गेला होता. मात्र तिने त्याला बाजूला झोपण्यास नकार दिला. त्यातून त्यांच्यात खटके उडाले आणि रागाच्या भरात त्याने त्याची पत्नी विजयमाला हिच्या डोक्यात दगडाचा पाटा मारला. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती.

या घटनेनंतर तो प्रचंड घाबरला आणि घरातून बाहेर निघून गेला. काही वेळानंतर तो मालवणी पोलीस ठाण्यात आला. त्यानंतर त्याने घडलेला प्रकार तिथे पोलिसांना सांगितला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या पत्नीला पोलिसांनी तातडीने जवळच्या भगवती रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच आरोपी पती ज्ञानोबा बलाडे याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in