
एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिवसेनानेते रामदास कदम यांनीसुद्धा शिवसेना नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. “मी, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत असल्यामुळे मला १९९५ साली मंत्रिपद देण्यात आले नाही,” असे रामदास कदम यांनी सांगितले.
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला खूप काही दिले; पण १९९५ साली आमची सत्ता आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात असूनही मी मंत्री का झालो नाही, हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारावे. तुझं नाव मंत्र्यांच्या यादीमध्ये आहे; पण तुला मंत्रिमंडळात घेण्यावरून माझ्या घरी भांडणं होत आहेत, असे मला बाळासाहेबांनी त्यावेळी सांगितले होते. फक्त मी राज ठाकरे यांच्यासोबत होतो, म्हणून मला मंत्रिपद दिले गेले नाही,” असा आरोप रामदास कदम यांनी केला.
“राज ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्यांना मंत्रिपद द्यायचे नाही, अशी भूमिका कदाचित उद्धव यांची होती. मी, तुला मंत्रिमंडळात घेणार, असे मला बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते; पण माझ्यामुळे तुमच्या घरात भांडणं होत असतील तर मी थांबतो, असे मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितले होते,” असे रामदास कदम यांनी सांगितले. “शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसॉर्टची माहिती मी भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिली नव्हती. किरीट सोमय्या यांना रिझवान काझी यांनी माहिती दिली होती. मी तुळजाभवानी, बाळासाहेब ठाकरे तसेच माझ्या तीन मुलांची शपथ घेऊन सांगतो की, आजपर्यंत मी किरीट सोमय्या यांना कोणतीही माहिती दिलेली नाही. हे सगळे कटकारस्थान अनिल परब यांनी केले,” असे कदम यांनी सांगितले.