IIT Bombay मध्ये रामायणाचा अपमान करणारं नाटक; विद्यार्थ्यांना १.२० लाखांचा दंड, सोशल मीडियावर वादाला फुटले तोंड

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (IIT Bombay ) ने संस्थेच्या वार्षिक कला महोत्सवात 'राहोवन' नावाचे नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १.२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
IIT Bombay मध्ये रामायणाचा अपमान करणारं नाटक; विद्यार्थ्यांना १.२० लाखांचा दंड, सोशल मीडियावर वादाला फुटले तोंड

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (IIT Bombay ) ने संस्थेच्या वार्षिक कला महोत्सवात 'राहोवन' नावाचे नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १.२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. भारतीय महाकाव्य 'रामायण' वर आधारित, या नाटकात प्रभू रामाचा आणि हिंदू संस्कृतीचा अनादर केल्याचा आरोप झाला होता. ३१ मार्च रोजी आयआयटी बॉम्बेच्या वार्षिक कला महोत्सवात हे नाटक सादर करण्यात आले होते.

सेमिस्टरच्या फीएवढा दंड -

संस्थेतील किमान आठ विद्यार्थ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. या नाटकात संस्थेच्या विविध विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते. एखाद्या मोठ्या इन्स्टिट्यूटमधील सेमिस्टरच्या फीएवढ्या दंडाशिवाय विद्यार्थ्यांना जिमखाना पुरस्कारांमध्ये कोणतीही मान्यता मिळणार नाही. याव्यतिरिक्त, त्यांच्या कनिष्ठांना प्रत्येकी ४०, ००० रुपये दंड आणि वसतिगृहाच्या सुविधांपासून बंदी घालण्यात आली आहे.

नाटकाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यातील सीता आणि लक्ष्मण यांच्या भूमिका करणाऱ्या विद्यार्थ्यांमधील संवादावरुन बरीच टीका झाली. हे नाटक हिंदू संस्कृती आणि धार्मिक भावनांची चेष्टा करणारे असल्याचा आरोपही करण्यात आला. यानंतर संस्थेने शिस्तपालन समिती स्थापन केली आणि समितीने आता दंड व इतर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

कशी आहे सोशल मीडियाची प्रतिक्रिया?

आयआयटी बॉम्बे येथील घटनेवरून सोशल मीडियावर निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही वापरकर्ते नाटकाला परवानगी दिल्याबद्दल संस्थेवर टीका करत आहेत. तर, काहीजण दंड आकारण्याच्या संस्थेच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आहेत. संस्थेने केलेल्या कारवाईबद्दलचे गोपनीय दस्तऐवज सोशल मीडियावर कसे लीक झाले यावरुनही प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, आयआयटी बॉम्बेने मात्र विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत भाष्य करण्यास नकार दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in