
अन्नाची नासाडी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने अन्न कचऱ्यापासून (फूड वेस्ट) वीजनिर्मिती प्रकल्प राबवला आहे. विशेष म्हणजे, या फूड वेस्टपासून वीजनिर्मिती प्रकल्पातून आतापर्यंत दीड लाख किलोपेक्षा अधिक वीजनिर्मिती करण्यात आली आहे. आता विजेचा वापर इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिगसाठी करण्यात येणार आहे. अन्नापासून वीजनिर्मिती करणारे मुंबई महापालिकेचे हाजी अली हे देशातील पहिले केंद्र आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिकाधिक करावा, असे आवाहन राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे. इलेक्ट्रिक वाहन ही काळाची गरज झाली असून, इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहेत. चार्जिंग स्टेशनला विजेची गरज लागणार असून विजेची कमतरता भासू नये, यासाठी मुंबई महापालिकेने अन्नापासून वीजनिर्मिती प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला होता.
‘स्वच्छ, सुंदर मुंबई’ अभियानाअंतर्गत महानगरपालिकेचा ‘डी’ विभाग आणि एरोकेअर क्लीन एनर्जी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प साकारला आहे. हाजी अली परिसरात केशवराव खाड्ये मार्गावर स्व. मीनाताई ठाकरे उद्यानाजवळ महानगरपालिकेने वाया गेलेल्या अन्नापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सप्टेंबर २०२१ मध्ये करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे दीड लाख किलोपेक्षा अधिक टाकून दिलेल्या अन्नपदार्थांवर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्यात आली आहे.