
कोरोना जणू संपलेला आहे, अशीच सर्वांची समजूत झालेली आहे. पण, या समजुतीला तडा देणारी आकडेवारी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ मुंबईत गेल्या आठवड्यात आढळली आहे. एका आठवड्यात ६० टक्के रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबई मनपा प्रशासन हादरले आहे.
१ ते ७ दरम्यान मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ६९२ वरून ११५३ वर गेली आहे. मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट १.५३ वर गेला आहे. २४ ते ३० एप्रिल दरम्यान हा दर १ टक्के होता.
केंद्राकडून नवीन मार्गदर्शक तत्वांची प्रतीक्षा
कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता काय उपाययोजना कराव्यात, यासाठी पालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना केंद्राच्या नवीन मार्गदर्शक तत्वांची प्रतिक्षा आहे.
कोविडचे नियम पाळा
आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, नागरिकांनी कोरोनाची मार्गदर्शक तत्वे पाळावी. तसेच लसीकरण करून घ्यावे. त्यामुळे त्यांना प्रादूर्भाव होण्याची शक्यता कमी असेल.
सरकारी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरनी सांगितले की, मुंबईत रुग्णसंख्या वाढत असली तरीही घाबरण्याचे कारण नाही. कारण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र, प्रत्येक वॉर्ड अधिकाऱ्याला परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार, आम्हाला कोविड चाचण्या करण्याबाबत मर्यादा आल्या आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने चाचण्या वाढवणे गरजेचे आहे.
राज्याच्या कोविड टास्कफोर्सने सांगितले की, ओमायक्रॉनचा प्रादूर्भाव आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढू शकते. नागरिकांनी कोविडचे नियम पाळणे सोडून दिले आहे. ते गर्दीच्या ठिकाणी मास्कही वापरत नाहीत. दिल्लीत रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर तेथे पुन्हा मास्क सक्तीचा केला आहे. पण, मुंबई व महाराष्ट्रात कोणतेच निर्बंध नाहीत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.