पहिल्‍या संघर्षात शिंदे गटाने मारली बाजी,खरी परीक्षा आज होणार

या निवडणुकीत ३ आमदार तटस्थ तर १२ आमदार अनुपस्थित राहिले.
पहिल्‍या संघर्षात शिंदे गटाने मारली बाजी,खरी परीक्षा आज होणार

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकत महाविकास आघाडीच्या विरोधातील पहिल्‍याच संघर्षात शिंदे गट आणि भाजपने बाजी मारली आहे; पण त्यांची खरी परीक्षा सोमवारी आहे. विधानसभेत सत्ताधारी भाजप-शिंदे गटाला विश्वासदर्शक ठराव जिंकावा लागणार आहे. शिंदे गटाला अद्याप स्वतंत्र गटाची मान्यता नसल्याने या ठरावावरील फुटीर गटाच्या सदस्यांचे मतदान कायदेशीरित्या ग्राह्य धरले जाणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदेगट आणि भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या बाजूने १६४ तर आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने १०७ मते पडली. या निवडणुकीत ३ आमदार तटस्थ तर १२ आमदार अनुपस्थित राहिले. उपाध्यक्षपदावर असल्‍याने झिरवाळ यांनी मतदानात भाग घेतला नाही. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मतविभाजनाचा कौल जाहीर करून नार्वेकर यांची अध्यक्षपदी बहुमताने निवड जाहीर केली. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे सोळावे अध्यक्ष म्हणून नार्वेकर यांनी सूत्रे हातात घेतली.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी २८७ पैकी १२ आमदार गैरहजर होते. शिवसेनेचे रमेश लटके यांचे निधन झाले आहे. सध्या गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे, बबनराव शिंदे, निलेश लंके, भाजपचे लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, एमआयएमचे मुफ्ती इस्माईल रविवारी सभागृहात गैरहजर होते. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या आधी सभागृहात पाच मिनिटे घंटी वाजविण्यात आली. घंटीची वेळ थांबल्यानंतर सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते आणि अण्णा बनसोडे यांना सभागृहात मतदानासाठी येता आले नाही. समाजवादी पक्षाच्या दोन तर एमआयएमच्या एका सदस्याने तटस्थ भूमिका घेतली.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी नार्वेकर यांच्या पारड्यात मत टाकले. त्यामुळे अपक्ष आणि बहुजन विकास आघाडीसारख्या छोट्या पक्षाच्या पाठिंब्यामुळे शिंदे गट आणि भाजपची सभागृहातील ताकद वाढली आहे.

शिवसेनेत बंड करून आघाडी सरकार खाली खेचणाऱ्या एकनाथ शिंदे गट आणि भाजप युतीने एकत्र सरकार स्थापन केल्यानंतर आयोजित केलेल्या विधानसभेच्या दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. शिंदे गट आणि भाजप युतीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करावी, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांनी अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि त्याला काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर झिरवाळ यांनी हा प्रस्ताव मतास टाकला.

प्रस्तावाच्या बाजूने अनुकूल आणि प्रतिकूल मते जाणून घेण्यापूर्वी पाच मिनिटे सभागृहाची घंटी वाजविण्यात आली. त्यानंतर सभागृहाचे दरवाजे बंद करून मतविभागणी घेण्यात आली. सुरुवातीला नार्वेकर यांच्या बाजूने असलेली मते मोजण्यात आली. परंतु, मतमोजणीवेळी अनुक्रमांक सांगताना अनेक सदस्य गडबडल्याने पुन्हा नव्याने मतमोजणी सुरु झाली. या मतमोजणीत नार्वेकर यांच्या बाजूने १६४ तर साळवी यांच्या बाजूने १०७ मते पडली. ही मतमोजणी झाल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित केले.

या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे अजय चौधरी यांनी नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या आसनाजवळ नेले. नार्वेकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याने फेब्रुवारी २०२१ पासून रिक्त असलेले पद आता भरले गेले आहे.

काय झाडी....

शहाजीबापू पाटील हे त्‍यांच्या काय झाडी, काय डोंगार... या डायलॉगमुळे फेमस झाले आहेत. आज देखील मतदानावेळी ते उभे राहिले असता विरोधी बाकांवरून कोणी तरी काय झाडी...असा आवाज दिला. त्‍यामुळे एकच हशा पिकला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in