मुंबई : पार्टटाईम जॉंबची ऑफर देऊन टास्कद्वारे गुंतवणूक करण्यास सांगून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या अज्ञात सायबर ठगाने चक्क एका आयकर निरीक्षकाला ८ लाख ६१ हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जॉंबची ऑफर देऊन त्यांना विविध टास्कमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी तेरा अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारीही संमातर तपास करत आहेत.
यातील तक्रारदार नवी मुंबईत राहत असून, ते सध्या चर्चगेट येथील आयकर विभागात आयकर निरीक्षक म्हणून करतात. ११ सप्टेंबरला त्यांना नेहा शर्मा नाव सांगणाऱ्या एका महिलेने मॅसेज करून घरबसल्या रेटींगचे काम देण्याची ऑफर देताना त्यांना जास्त कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. तिने त्यांना एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन करुन त्यांनी रेटींग दिल्यानंतर त्यांच्या फोन पे ऍपवर २१० रुपये जमा झाले होते. त्यानंतर त्यांना टेलिग्रामच्या एका ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले होते. यावेळी तिने त्यांना विविध लिंक पाठवून त्यांना रेटींग देण्यास प्रवृत्त केले, त्यांनी रेटींग दिल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे जमा होत होते. त्यानंतर तिच्यासह इतर आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना विविध टास्कसाठी पैसे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.