राज्यात सात महिन्यांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ

स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर आणि पालघर जिल्ह्यातील आहेत
राज्यात सात महिन्यांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ

राज्यात २०२२मध्ये म्हणजेच गेल्या सात महिन्यांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून ही संख्या आता ५५२ वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी सात महिन्यांत ३८७ स्वाइन फ्लूचे रुग्ण सापडले होते, त्यानंतर यंदा त्यात दर महिन्याला ७८ याप्रमाणे ५५२ रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे २०२१मध्ये स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ होती, तीच आता फक्त सात महिन्यांत २०वर गेली आहे.

स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर आणि पालघर जिल्ह्यातील आहेत. सर्व जिल्ह्यांमधील स्वाइन फ्लूवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कॉलराचे ३०० रुग्ण सापडले असून त्यापैकी सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

आकडेवारीनुसार, स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत १४२ असून त्यापाठोपाठ ठाणे महानगरपालिका (८२), कोल्हापूर (५४), नाशिक (४१), पालघर (३६), कल्याण महानगरपालिका (२३), नवी मुंबई (१२), मिरा-भाईंदर (५), ठाणे जिल्हा (४), रायगड (४), पुणे (३), पिंपरी-चिंचवड (३) आणि वसई-विरार (२) यांचा क्रमांक लागतो.

तसेच कोल्हापूर, ठाणे महानगरपालिका, पुणे ग्रामीण, पुणे महानगरपालिका येथील प्रत्येकी तीन रुग्णांचा तर सातारा, पिंपरी-चिंचवड येथील दोन रुग्णांचा तर ठाणे ग्रामीण, रायगड महानगरपालिका आणि नाशिक येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in