कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ ; १५ दिवसांत १७ रुग्णांचा मृत्यू

मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर कोरोनाच्या तीन लाटा धडकल्या होत्या
कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ ; १५ दिवसांत १७ रुग्णांचा मृत्यू

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा फैलाव रोखण्यात यश आले, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ कायम असून गेल्या १५ दिवसांत १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्येत होणारी वाढ अन् दोन वर्षांनंतर गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असल्याने वाढती रुग्णसंख्या चिंतेत भर टाकणारी आहे.

मार्च २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर कोरोनाच्या तीन लाटा धडकल्या होत्या. कोरोनाचे नवीन व्हेरिएंटही समोर आले; मात्र राज्य सरकार व मुंबई महापालिकेने राबवलेल्या विविध उपाययोजना व मुंबईकरांची साथ यामुळे तिन्ही लाटा परतवण्यात यश आले; मात्र मे २०२२ मध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने शिरकाव केला आणि पुन्हा एकदा कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केला. आरोग्य विभागाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे चौथी लाट ओसरली, असे संकेत मिळत असताना पुन्हा एकदा चौथ्या लाटेचा फैलाव होऊ लागला आहे. एप्रिलमध्ये तर दैनंदिन रुग्णसंख्या ३०पर्यंत खाली आली होती; मात्र यानंतर पुन्हा एकदा रुग्णसंख्येने अडीच हजारांचा टप्पा पार केल्याने मुंबईचे टेन्शन वाढले होते; मात्र जुलैमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या घटून पुन्हा २५० ते ३०० पर्यंत नोंद होऊ लागली.

गणेशोत्सवाच्या तोंडावर रुग्णसंख्या घटल्याने दिलासा मिळाला असतानाच ऑगस्टमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दररोज ८०० ते एक हजारांच्या घरात नवीन रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी आणि शक्यतो मास्कचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी मुंबईकरांना केले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in