मालदीवला बांगलादेशी पत्नीसोबत जाणाऱ्या भारतीय पतीला अटक

पती-पत्नीचा ताबा सहार पोलिसांकडे
मालदीवला बांगलादेशी पत्नीसोबत जाणाऱ्या भारतीय पतीला अटक

मुंबई : मालदीवला जाण्यासाठी बांगलादेशी पत्नीसोबत आलेल्या भारतीय पतीला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. बोगस दस्तावेज सादर करून सुरत येथून पासपोर्ट बनवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी या पती-पत्नीविरुद्ध सहार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

मोहम्मद यासिन मोहम्मद सलमान शेख आणि ताहेरा खानूम आरिफ शेख अशी या पतीपत्नीची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. ताहेरा ही मूळची बांगलादेशी नागरिक असून गेल्या वर्षी ती बांगलादेशातून पळून उत्तर प्रदेशात आली होती. तिथे काही दिवस वास्तव्य केल्यानंतर ती सुरतला स्थायिक झाली. यावेळी तिने मोहम्मद यासिन याच्यासोबत विवाह केला होता. त्यानंतर तिने बोगस दस्तावेजचा वापर करून सुरत येथील पासपोर्ट कार्यालयातून एक भारतीय पासपोर्ट मिळविला होता. याकामी तिला मोहम्मद यासिनने मदत केली होती. याच पासपोर्टवर ते दोघेही शनिवारी सकाळी मालदीवला जाण्यासाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले होते. या दोघांचा पासपोर्ट, व्हिसा आणि बोर्डिंग पासवर संशय आल्यानंतर त्यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत ताहेरा ही बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. तिच्या चौकशीत ती विवाहित असून तिने पहिला विवाह इम्रान खान ऊर्फ रुपेश मौलासोबत केला होता. मात्र काही महिन्यानंतर त्याने तिला सोडून दिले होते. त्यानंतर तिने गेल्या वर्षी भारतीय नागरिक असलेल्या मोहम्मद यासिनसोबत विवाह केला. काही दिवसांनी तिला मोहम्मद यासिन हा विवाहित असल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांच्यात खटके उडू लागले. त्यामुळे ती पुन्हा तिचा पहिला पती इम्रान खानकडे गेली. काही दिवस सुरतला राहिल्यानंतर ते दोघेही बांगलादेशात निघून गेले. सहा महिने तिथे राहिल्यानंतर ती पुन्हा भारतात आली होती. तिने मोहम्मद यासिनसोबत समेट केला. त्यानंतर ते दोघेही एकत्र राहू लागले. शनिवारी ते दोघेही मालदीवला जाण्यासाठी आले होते. मात्र ताहेरा ही बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस येताच या पती-पत्नींना सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in