राज्याच्या औद्योगिक विकासाची ब्ल्यू प्रिंट बनावी

राज्यपाल रमेश बैस यांची अपेक्षा : पहिल्या उद्योग पुरस्कारांचे वितरण
राज्याच्या औद्योगिक विकासाची ब्ल्यू प्रिंट बनावी

मुंबई : महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी उद्योगपती, व्यापारी संस्था आदी सर्व संबंधित घटकांचा समावेश असणारी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले. महिला उद्योगपतींसाठी समर्पित औद्योगिक पार्क बनविण्याचाही विचार करण्यात यावा, असेही ते म्हणाले. राज्य सरकारच्या उद्योग विभाग आणि एमआयडीसीतर्फे राज्याच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्र उद्योग पुरस्कारांचे रविवारी वितरण झाले.

पहिला उद्योगरत्न हा मानाचा पुरस्कार रतन टाटा यांना देण्यात आला. प्रकृतीच्या कारणास्तव शनिवारीच त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाऊन टाटांना तो प्रदान केला. रविवारी बीकेसी येथील जीओ सेंटरमध्ये आयोजित समारंभात युवा उद्योजक म्हणून सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला, किर्लोस्कर समूहाच्या पाचव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला उद्योजिका गौरी किर्लोस्कर, कृषी उद्योजक विलास शिंदे यांना हा पुरस्कार राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे सीईओ डॉ. विपिन शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात नंबर वन -मुख्यमंत्री

महाराष्ट्र हे उद्योग क्षेत्रात नंबर वनवर असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘उद्योगरत्न पुरस्कारासाठी माणसातला देवमाणूस रतन टाटा यांची निवड झाल्याबद्दल अतिशय गर्व वाटत आहे. रतन टाटांना हा पुरस्कार मिळाल्याने पुरस्काराचीच उंची वाढली आहे. दावोस येथे जे एमओयू आम्ही केले. त्यावर केवळ सह्या करून आम्ही शांत राहिलो नाही. त्याचा पाठपुरावा केला. आज त्यापैकी ८० टक्के करारांची अंमलबजावणी झाली आहे. महाराष्ट्र हे इंडस्ट्रीसाठी फेवरिट डेस्टीनेशन ठरले आहे. राज्यातील उत्पादकता वाढविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले आहे. त्यातील १ ट्रिलियन डॉलर्सचा वाटा महाराष्ट्राचा असणार आहे. चंद्रशेखरन समितीने ज्या शिफारशी केल्या आहेत, त्याच्या अंमलबजावणीसाठी फास्ट ट्रॅक कमिटी स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

वाढवणसारखे सर्वात मोठे बंदर महाराष्ट्रात -देवेंद्र फडणवीस

जेएनपीटीमध्ये देशाच्या एकूण बंदर वाहतुकीच्या ६५ टक्के वाहतूक होते. पण, आता त्याच्याही तिप्पट क्षमतेचे वाढवण बंदर महाराष्ट्रात होते आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनेही त्याला मान्यता दिल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘हा विकास करताना स्थानिक मच्छीमारांनाही विश्वासात घेण्यात येणार आहे. देशातील पुढची स्टीलसिटी गडचिरोली असणार आहे. पुणे आयटी हब, मुंबई देशाची आर्थिक राजधानी, नाशिकमध्ये संरक्षण क्षेत्राशी निगडित उत्पादनक्षेत्राचा विकास, समृद्धी मार्गाने संभाजीनगर आणि विदर्भाचा विकास, असा विकासाचा समतोल राज्यात राखण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा १ ट्रिलियनचा वाटा असेल. थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक एकवर आहेच, पण आता प्रत्यक्ष गुंतवणुकीत देखील महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे. उद्योजकांना सर्व परवानग्या एक खिडकी योजनेतून मिळाव्यात यासाठी मैत्री कायदा आणला आहे. लवकरच इंडस्ट्री फॅसिलिटेशन सेंटरही स्थापन करण्यात येणार आहे. स्टार्टअपमध्येही महाराष्ट्र क्रमांक एकवरच आहे. उद्योग पुरस्कार सुरू केल्याबद्दल उदय सामंत यांचे कौतुकही देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दादा मला वाटले बारामतीच बोलता की काय?

उद्योग पुरस्कार एकूण चार जणांना देण्यात आले. त्यापैकी आदर पुनावाला आणि गौरी किर्लोस्कर हे दोघेही पुण्याचे असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे अजित पवार म्हणाले. आदर पुनावाला यांनी मनोगत व्यक्त करताना, ‘‘महाराष्ट्रात आपल्याला आपलेपणा वाटतो. सरकार आपलेपणाने सर्व सोयीसुविधा पुरविते. त्यामुळे लसींचे पुढचे सर्व प्रकल्प आपण महाराष्ट्रातच सुरू करणार असल्याचे जाहीर केले. हाच धागा पकडत अजितदादांनी हे प्रकल्प महाराष्ट्रात आणि पुण्यातच होतील, असे म्हटले. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, दादा पुण्यात म्हणत होतात तेव्हा मला वाटले की बारामतीतच बोलता की काय, पण समृद्धी महामार्गामुळे आता छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भ देखील डेस्टीनेशन आहे. तिथेही उद्योग येतील. अर्थमंत्री म्हणून त्यासाठी साथ द्याल, असा विश्वास असल्याचे म्हटले.

रतन टाटांना पुरस्कार हा इतिहासात नोंद होईल -अजित पवार

एमआयडीसीची स्थापना स्व. यशवंतराव चव्हाण यांनी १९६२ सालीच केली, पण तेव्हापासून आजपर्यंत कोणाच्याच डोक्यात असा पुरस्कार सुरू करावा हे आले नाही. इतकी वर्षे मी देखील मंत्रिमंडळात काम केले, पण माझ्याही हे लक्षात आले नाही, अशी प्रांजळ कबुली देत अजित पवार म्हणाले, उदय सामंत यांच्या हे लक्षात आले. त्यांनी पुढाकार घेऊन हा सोहळा आयोजित केला त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना उद्योगरत्न पुरस्कार दिल्याने त्याची आता इतिहासात नोंद झाली आहे. आदर पुनावाला आणि गौरी किर्लोस्कर हे दोघेही पुणेकर असल्याचा अभिमान असल्याचे अजित पवार म्हणाले.

परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक एकवर

महाराष्ट्रात टाटा उद्योग समूहाचे म्युझियम -उदय सामंत

दावोसमध्ये १ लाख ३७ हजार कोटींचे एमओयू करण्यात आले होते. त्यातील ७७ टक्के म्हणजे १ लाख ६ हजार कोटींचे एमओयू प्रत्यक्षात आले आहेत. १ लाख १८ हजार ४२२ कोटींच्या परदेशी गुंतवणुकीसह महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे. टाटा उद्योग समूहाचा देश आणि महाराष्ट्राच्या प्रगतीत मोठा वाटा आहे. टाटा उद्योग समूहाची माहिती देणारे जागतिक दर्जाचे एक म्युझियम उभारण्यात येणार आहे. रतन टाटा यांनी त्याची परवानगी दिल्याची माहिती यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in