
मुंबईमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र असलेल्या वडाळा येथील श्री गणेश विद्यालय येथे पुरेश्या सोयी सुविधा नसल्याची तक्रार करण्यात आली. विद्यार्थ्यांना या केंद्रावर परीक्षा लिहिण्यासाठी अडचण येत असल्याची तक्रार संबंधित विद्यार्थी आणि पालकांनी ठाकरे गटाचे आमदार आणि युवानेते आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. सदर तक्रारीमध्ये म्हंटले आहे की, परीक्षेसाठी देण्यात आलेले बाकडे हे अत्यंत लहान आहेत. तसेच, वर्गांमध्ये पुरेसा उजेड नाही, शिवाय पंखेदेखील नाहीत. यामुळे प्रचंड गर्मीमध्ये त्यांना ही परीक्षा द्यावी लागत आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षाकेंद्रावर प्रचंड अडचणी येत आहेत.
आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार आल्यानंतर युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी पाहणी केली. त्यानंतर हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला गेला. यानंतर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सदर १७० विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलुन देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, सदर तक्रर ही मुंबई शालेय माध्यमिक मंडळाचे डॉ. एस. बोरसे यांना दूरध्वनीद्वारे सविस्तर माहिती दिली होती.