
मुंबई : हवेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी धुळीचे प्रमाण नियंत्रित करणे गरजेचे आहे. मुंबई शहरात धुळीचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी अँटीस्मोक मशीनने फवारणी करण्यात येत आहे. प्रदूषण हे फक्त मुंबई शहरातच आहे असे नाही तर उपनगरातही प्रदूषणाचा विळखा बसला आहे. मात्र उपनगरात धुळीचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी अँटीस्मोक मशीनच उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रदूषण फक्त मुंबई शहरातच आहे का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पावसाने माघार घेतल्यानंतर १५ दिवसांत मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आणि प्रदूषणात वाढ झाली. हवेची गुणवत्ता खालावली, मुंबई प्रदूषित होत असल्याची दखल केंद्र व राज्य सरकारने घेतली आणि प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश देताच कठोर उपाययोजना करण्याची कार्यवाही पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबईत सध्या सुमारे सहा हजार बांधकामे सुरू आहेत. बांधकाम ठिकाणी धुळीचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी पालिका प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. तसेच मुंबई शहरात धुळीचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी अँटीस्मोक मशीनने दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट, वरळी, गिरगाव, हाजी अली फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. धुळीचे कण फक्त मुंबई शहरातच आहेत का?, असा सवाल मुंबईकरांनी उपस्थित केला आहे.
२४ वॉर्डात २४ मशीन
धुळीचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मिस्ट मशीन घेण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. एकूण ३० मिस्ट मशीन घेण्यात येणार असून २४ वॉर्डांसाठी २४ मशीन उपलब्ध असणार आहेत. उर्वरित सहा मशीन राखीव म्हणून ठेवण्यात येणार आहेत. एखाद्या मशीनमध्ये बिघाड झाल्यास या राखीव मशीनचा वापर करणे शक्य होणार आहे.
लवकरच उपनगरातही मशीन
फक्त मुंबई शहरात धुळीचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी अँटीस्मोक मशीनने फवारणी करण्यात येते असे नाही. तर लवकरच पूर्व व पश्चिम उपनगरात या मशीन उपलब्ध करण्यात येतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पालिकेच्या निष्क्रियतेमुळे हवेची गुणवत्ता खालावली
रस्त्यावर कुठेही कचरा टाकला जातो, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन वर्षांपासून क्लीनअप मार्शल नाहीत. झोपडपट्ट्या आणि असंख्य सोसायट्यांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण होत नाही. कचरा जाळण्यावर दंडात्मक कारवाई नाही. महापालिकेच्या या निष्क्रियतेमुळे बांधकाम क्षेत्रातील धुळीपाठोपाठ कचऱ्याची दुर्गंधी ही मुंबईतील हवामान खराब करण्यामागची काही कारणे आहेत. हिवाळा सुरू होण्यापूर्वीच मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत घट होणे, हे चिंताजनक मानले जाते आहे.