बालकांच्या लैंगिक शोषणाविषयी जनजागृती करणे गरजेचे! बेस्टच्या उपक्रमाबाबत आदिती तटकरे यांचे मत

एखाद्या मोठ्या व्यक्तीवर अत्याचार झाला तर त्याला ही बोलणं आपली व्यथा मांडणे अवघड जाते.

मुंबई : मुंबई : ‘सेफ टच, अनसेफ टच’ याबाबत बहुतांश लहान मुलांना काहीही कल्पना नसते. आई वडील मुलाचे पहिले गुरू असले तरी मुलं शिक्षकांचे अधिक ऐकतात. त्यामुळे बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी शाळा व शिक्षकांनी मुलांमध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. बेस्ट उपक्रम व अर्पण संस्थेच्या माध्यमातून बेस्टच्या बसेस मध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

एखाद्या मोठ्या व्यक्तीवर अत्याचार झाला तर त्याला ही बोलणं आपली व्यथा मांडणे अवघड जाते. अपर्ण संस्था व बेस्ट उपक्रमाने जनजागृतीसाठी बसेस मध्ये पोस्टर्स, व्हिडिओ क्लिपद्वारे जनजागृती मोहीम राबवणे हा खूप चांगला उपक्रम आहे. अर्पण संस्थेच्या या मोहिमेसाठी बेस्ट उपक्रमाने काही वेळातच होकार दिल्याने महाव्यवस्थापक विजय सिंघल यांचे कौतुक आहे. अर्पण संस्थेने बेस्टच्या बसेस मध्ये जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला तसाच प्रस्ताव राज्य परिवहन विभागाला सादर करावा, जेणे करुन राज्यभर या मोहिमेचा प्रसार होईल, असे ही त्या म्हणाल्या.

अर्पण सोबतची भागीदारी केवळ एक सहयोग नाही तर हे मुंबईकरांना दिलेले वचन आहे. प्रत्येक दिवशी प्रवासी उपक्रमाबद्दल जो विश्वास दाखवितात त्याची आम्हाला जाण आहे आणि आम्ही या जबाबदारीकडे गांभीर्याने पहातो. बेस्ट बसमधील प्रत्येक प्रवास प्रवाशांसाठी विशेषतः आमच्या सर्वात लहान प्रवाश्यांसाठी सुरक्षित करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटीबध्द आहोत. अर्पण या संस्थेसोबत, आम्ही बाल लैंगिक शोषण याबाबतची जागरुकता वाढवण्यासाठी, आमच्या कर्मचा-यांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि आमच्या शहरातील मुलांच्या कल्याणासाठी योगदान देण्यासाठी अथक काम करत राहू, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in