डॉ. सुमीत लहानेंविरुद्ध कारवाई करा ; जे.जे. हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांची मागणी

सुमीत लहाने यांनी आपल्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी ज्युनियर डॉक्टरांना धमकावल्याचा आरोप
डॉ. सुमीत लहानेंविरुद्ध कारवाई करा ; जे.जे. हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांची मागणी

जे.जे. हॉस्पिटलमधील ऑप्थलमोलॉजी विभागाच्या कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी डॉ. तात्याराव लहाने यांचे पुत्र डॉ. सुमीत लहाने यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी हॉस्पिटलच्या अधिष्ठात्यांकडे केली आहे. सुमीत लहाने यांनी आपल्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी ज्युनियर डॉक्टरांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

डीएमईआरचे निवृत्त संचालक आणि माजी अधिष्ठाते डॉ. तात्याराव लहाने हे अद्यापही विभागात मोतिबिंदू शस्त्रक्रिया करत असल्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमावर त्याचा प्रतिकूल परिणाम घडत आहे. हे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारे आहे, अशी तक्रार जे.जे.मधील कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी केली आहे. यावर जे.जे. हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी तीनसदस्यीय समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.

“निवासी डॉक्टरांकडून आम्हाला पत्र मिळाले असून, त्याची चौकशी करण्यासाठी तसेच पुढील कार्यवाही करण्यासाठी समिती नेमली जाणार आहे. तात्याराव लहाने यांचे पुत्र डॉ. सुमीत लहाने हे विभागात येऊन ज्युनियर डॉक्टरांना आपली तक्रार मागे घेण्यासाठी धमकावत असल्याचे पत्र आम्हाला सोमवारी प्राप्त झाले आहे,” असे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.

डॉ. सुमीत लहाने हे व्याख्याता या नावाने रुग्णांवर मोतिबिंदू, कॉर्निया आणि ऑक्युलोप्लास्टीच्या शस्त्रक्रिया करत आहेत. “डॉ. सुमीत लहाने यांनी अनेक निवासी डॉक्टरांना व्हॉट्सॲॅपच्या माध्यमातून तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले आहे. या व्हॉट्सॲॅप संभाषणाचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत डॉ. सुमीत लहाने यांना विभागाच्या आवारात येण्यास मनाई करावी तसेच त्यांना रुग्णांवर उपचार करण्यापासूनही रोखावे,’’ असे एका कनिष्ठ निवासी डॉक्टरने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in