मुंबई : महादेवअँपच्या सक्सेस पार्टीत हजर राहिलेल्या कॉमेडियन कपिल शर्माने ईडीला आपल्या उपस्थितीची माहिती दिली आहे. महादेव बेटिंग अँपच्या सक्सेस पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी अभिजीत चौधरी या मध्यस्थाने संपर्क साधला होता. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चा तपास सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल शर्माला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्याने पार्टीसंबंधी दिलेली माहिती पुरावा म्हणून ईडीने दखल घेतली आहे. त्याचबरोबर या प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. महादेव बेटिंग अँप प्रकरणात कपिल शर्मा व्यतिरिक्त हिना खान, हुमा कुरेशी, श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूर यांनाही ईडीने समन्स बजावले आहेत.
आरोपपत्रानुसार, महादेव ॲपच्या सक्सेस पार्टीसाठी कपिल शर्माशी संपर्क साधणाऱ्या अभिजीत चौधरीने सांगितले की, तो १८ सप्टेंबर २०२२ रोजी दुबईमध्ये झालेल्या पार्टीचा संयोजक होता. महादेव अँप सक्सेस पार्टीसाठी सेलिब्रिटीजची नियुक्ती करण्यासाठी दोन व्यक्तींनी त्याच्याशी संपर्क साधला. मात्र, सेलिब्रिटींनी महादेव अँप पार्टीत हजर राहण्यास किंवा परफॉर्म करण्यास नकार दिला. देवांग शहा आणि करण रमाणी नावाच्या दोन व्यक्तींनी त्याला महादेव अँपचा संदर्भ काढून त्याऐवजी दुबईस्थित मुस्कान मॅनेजमेंट कंपनीच्या नावाने प्रसिद्ध व्यक्तींशी संपर्क साधण्याची सूचना केली.