मुंबई : खार - गोरेगाव स्थानकादरम्यान सहाव्या लेनचे काम करण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या २६ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या १३ दिवसांच्या कालावधीत मेल-एक्स्प्रेस लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. मेल-एक्स्प्रेस, लोकल सेवा रद्द होणार असल्याने मुंबई महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे या १३ दिवसांच्या काळात पालिका कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीत सवलत द्या, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केल्याचे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून सांगण्यात आले.
मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळेत हजेरी लागली नाही, तर लेटमार्क किंवा गैरहजेरी लागते. पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या २६ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर यादरम्यान मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान ६ व्या लाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. या कालावधीत दररोज सरासरी २०० लोकल व लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस सेवा रद्द करण्यात येणार आहेत. याच कालावधीत २८ आणि २९ ऑक्टोबर या दिवशी जवळपास ४०० लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. यामुळे पश्चिम उपनगरे व डहाणू, पालघरपासून मुंबई महापालिकेतील विविध खात्यातील कामगार, कर्मचारी यांना कामावर येण्यास प्रवासादरम्यान अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
विशेष बससेवा उपलब्ध करून द्या
वेळेत पोहचण्यासाठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन सदर कालावधीत उपनगरातून व मुंबई बाहेरून येणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीमध्ये विशेष सवलत देण्याबाबतचे आदेश द्यावेत. तसेच विरार स्थानकावरून कामगारांसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी युनियनचे अध्यक्ष बाबा कदम यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.