खड्ड्यांमुळे तरुणाच्या मृत्यूला केडीएमसीला जबाबदार धरावे

मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
खड्ड्यांमुळे तरुणाच्या मृत्यूला केडीएमसीला जबाबदार धरावे
Published on

मुंबई : २२ जुलै रोजी कल्याणला खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराच्या मृत्यूला कल्याण-डोंबिवली मनपाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

२२ जुलै रोजी चिंचपाडा येथे एका तरुणाचा खड्डे वाचवताना तो रस्त्यात पडला. त्यानंतर तो ट्रकखाली चिरडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

ॲॅड. रूजू ठक्कर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून केडीएमसीच्या अधिकाऱ्यांवर मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

गेल्यावर्षी ७ डिसेंबरला खड्ड्यामुळे दुर्घटना घडल्यास त्याला मनपा आयुक्त, महानगर आयुक्त व संबंधित विभागाच्या मुख्य अभियंत्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा हायकोर्टाने दिला होता. त्यामुळे या प्रकरणी केडीएमसीला जबाबदार धरावे, असे याचिकादारांनी नमूद केले.

मुंबईसह राज्याच्या विविध भागांत खड्ड्यांमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यातील अनेक मृत्यू हे खड्डे चुकवताना झाले आहेत.

शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, हे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे त्यातून उल्लंघन होत आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था अतिखराब झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या दुर्दशेला सामोरे जावे लागत आहे.

उच्च न्यायालयाने आदेश देऊन पाच पावसाळे लोटले आहेत. तरीही प्रत्येक दिवशी नागरिकांना त्रास भोगावा लागतो. या प्रकरणी तातडीने उच्च न्यायालयाने आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. कारण त्यामुळे भविष्यात अनेकांचे मृत्यू टाळता येऊ शकतील. तसेच नागरिकांना निष्काळजीपणामुळे त्रास सहन करावा लागणार नाही, असे याचिकादाराने सांगितले.

न्या. धीरज ठाकूर व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी ३१ जुलै रोजी ठेवली आहे.

logo
marathi.freepressjournal.in