मुंबई : दिड वर्षांच्या मुलाचे अपहरण करून पळून गेलेल्या एका २८ वर्षांच्या महिलेस काही तासांत मालवणी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. सोनम मंताशे साहू असे या महिलेचे नाव असून तिच्या तावडीतून या मुलाची सुटका करण्यात आली आहे. तिने या मुलाचे अपहरण का केले याचा उलघडा होऊ शकला नाही. दिड वर्षांचा हा मुलगा त्याच्या बहिणीसोबत गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता गावदेवी मंदिर परिसरात खेळत होता. यावेळी तिथे एक महिला आली आणि तिने त्याच्या बहिणीला दोनशे रुपये देऊन दुकानातून बिस्कीट आणण्यास सांगितले. ती दुकानात गेल्यानंतर तिने दिड वर्षांच्या मुलाचे अपहरण करून तेथून पळ काढला होता.
हा प्रकार या मुलीकडून तिच्या आईला समजताच तिने मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या माहितीनंतर मालवणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन मालवणी पोलिसांनी अवघ्या काही तासांत अंधेरीतील वर्सोवा परिसरातून सोनम साहू या महिलेस ताब्यात घेतले होते. चौकशीत तिने या मुलाचे अपहरण केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिच्या घरातून पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले होते.