
मुंबई : विवाहबाह्य संबंधातून मित्रानेच मित्राची कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी वरळी परिसरात घडली. विनोद साळुंखे असे मृताचे नाव असून त्याच्या हत्येनंतर आरोपी मित्र गिरीश काशिनाथ जाधव याने वरळी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते. हत्येच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गिरीश आणि विनोद हे वरळीतील सिद्धार्थनगर परिसरात राहत असून ते बालपणीपासूनचे मित्र आहेत. गेल्या तीन वर्षांपासून विनोद हा गिरीशच्या घरी राहत होता. त्याचे त्याच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा विनोदला संशय होता. त्यातून या दोघांमध्ये प्रचंड वाद झाला होता. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता रागाच्या भरात गिरीशने विनोदवर कोयत्याने वार केले होते. डोक्यात वार केल्याने विनोद जागीच कोसळला होता. रक्तबंबाळ झालेल्या विनोदला तिथे टाकून गिरीश हा वरळी पोलीस ठाण्यात आला. त्याने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
जखमी झालेल्या विनोदला पोलिसांनी तातडीने केईएम रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपी मित्र गिरीश जाधवला अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सागितले.