महापालिकेला प्रीमियम महसुलाचा मोठा आधार

मुंबईचा विकास झपाट्याने होत असून विकासकांच्या माध्यमातून अनेक कामे सुरू आहेत.
 महापालिकेला प्रीमियम महसुलाचा मोठा आधार

विविध प्रकल्पांसाठी ठेवी मोडण्याची वेळ आलेल्या मुंबई महापालिकेला विकासकांकडून मिळणाऱ्या प्रीमियमचा मोठा आधार मिळाला आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत प्रीमियमपोटी तब्बल ७९९ कोटी रुपये पालिकेला मिळाल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

मुंबईचा विकास झपाट्याने होत असून विकासकांच्या माध्यमातून अनेक कामे सुरू आहेत. विकासकांना प्रकल्प राबवण्यासाठी मुंबई महापालिकेला प्रीमियम जमा करावा लागतो. विकासकांकडून मिळणाऱ्या प्रीमियममुळे पालिकेच्या तिजोरीत रोख रक्कम जमा होते. गेल्या वर्षी प्रीमियमच्या माध्यमातून पालिकेला तब्बल १४ हजार कोटी रुपये मिळाले होते. तर यंदाच्या आर्थिक वर्षांत तीन महिन्यांत प्रीमियमपोटी ८०० कोटी रुपये मिळाल्याचे वेलरासू यांनी सांगितले.

कोरोनामुळे अनेक उद्योग, व्यवसाय आर्थिक अडचणीत आले होते. यामध्ये मोठी गुंतवणूक होणाऱ्या रिअल इस्टेट क्षेत्रालाही मोठा तोटा सहन करावा लागला. अनेक प्रकल्प जागच्या जागी थांबले, तर अनेक तयार प्रकल्पांतील घरे विक्रीविना पडून राहिली. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने दीपक पारेख समिती नेमली होती. या समितीने मुंबई, ठाणे, पुणे महापालिकांना विकास नियंत्रण नियमावलीनुसार, बांधकामासाठी आकारले जाणारे विकास व विविध प्रकारची शुल्क, अधिमूल्यात (प्रीमियम) ५० टक्के कपात करण्याची शिफारस केली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in