मुंबई : गणेशोत्सवात काळात परळ, लालबाग परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. तसेच परळ वर्कशॉपसमोर मोठ्या गणेशमूर्ती पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भोईवाडा पोलिसांनी दोन वेळा सौम्य लाठीमार केला. मात्र, अशाप्रकारे भाविकांवर लाठीमार करणे चुकीचे आणि दुर्दैवी असून पोलिसांनी याबाबत सामंजस्याची भूमिका घेऊन तोडगा काढावा, अशी विनंती बृन्हमुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पोलिसांना केली आहे.
छोट्या गणेशमूर्तींबरोबर मोठ्या मंडळांच्या गणेशमूर्तीही लालबाग-परळमधील कार्यशाळेतून बाहेर पडत असतात. अशावेळी सुंदर, नयनरम्य आणि रेखीव बाप्पाची मूर्ती पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. परळ वर्कशॉपमधून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती आता सजावटीसाठी मार्गस्थ होऊ लागल्या आहेत. वाहतूक व्यवस्था कोलमडल्यामुळे आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रविवारी दोन वेळा पोलिसांनी भाविकांवर सौम्य लाठीमार केला. मात्र, अशाप्रकारे लाठीमाराचे आदेश दिले नसल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. गणेशोत्सवाची जागतिक किर्ती आणि स्वरूप लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने त्यावर सामंजस्याने तोडगा काढावा, अशी विनंती बृन्हमुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर यांनी पोलिसांना केली आहे.