सौर ऊर्जेच्या उत्पन्नालाही गळती

 सौर ऊर्जेच्या उत्पन्नालाही गळती

अपारंपारीक ऊर्जेचा वापर करावा यासाठी गेली कित्येक वर्षे देशपातळीवर प्रयत्न केले जात असताना एलईडी दिव्यांच्या वापरामुळे वीज बचतीचा महामार्ग गवसला आहे. एलईडी दिव्यांमुळे जवळपास ५० ते ६० टक्के वीज बचत होत असल्याचे उघड झाले आहे. ठाणे महापालिकेने गेल्या काही वर्षात शहरातील ७ हजार ५०० दिवे बदलून एलईडी केले आहेत. त्यामुळे वर्षाला पालिकेची ५ कोटी २२ लाख रुपयांची विजेची बचत झाली होऊ लागली आहे. ९ हजार सोडियम व्हेपरचे दिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे बसवल्यास पालिकेचे करोडो रुपयांची बचत होणार असली तरी त्यासाठी कोरोना काळातील दोन वर्षात यासाठी निधीच उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे या उर्जाबचतीच्या मोहिमेला खीळ बसलेली आहे. तर पालिकेच्या सौर ऊर्जेच्या उत्पन्नालाही मोठी गळती लागणार असल्याचे दिसत आहे. पीपीपीच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात १० मेगा वॉट सौर ऊर्जा तयार करण्याचे प्रस्तावित असताना सौर ऊर्जा निर्मितीसाठी योग्य जागा नसल्याचे उघड झाल्याने आता अवघा १३०० किलोवॅट सौर ऊर्जा निर्मितीचा नवा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

गेल्या दोन दशकात देशात बहुतांशी ठिकाणी सोडियम व्हेपरच्या दिव्यांना पसंती दिली जात होती. तर, त्यानंतर मरक्युरी दिव्यांचा ट्रेन्ड आला. मात्र, गेल्या काही वर्षात आपल्या देशावर वीजेचे संकट मोठ्या प्रमाणात आल्यामुळे वीजेची निर्मिती करण्याबरोबरच वीज बचतीचे निरनिराळे मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. यातूनच एलईडी दिव्यांना मोठ्या प्रमाणात पसंती देण्याचे काम सुरू झाले. इतर दिव्यांच्या तुलनेत मरक्यूरी बल्बचे आयुर्मान साधारण १७ हजार तास असते. तर, या उलट एलईडी दिव्याचे आयुर्मान हे जवळपास ६० हजार तास आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे एकदा दिवा लागल्यानंतर त्यासाठी लागणारा मेन्टनंन्सचा खर्च जवळपास शुन्य आहे. ठाणे महापालिकेच्या विद्यूत विभागाने गेल्या सहा वर्षापासून शहरातील एलईडी दिवे बदलण्याचे काम सुरू केले आहे. २८०वॅटचा दिवा काढून १३० वॅटचा दिवा तर, ज्या ठिकाणी १७५ वॅटचे दिवे होते. त्याचे रूपांतर ११० वॅटच्या एलईडी दिव्यात करण्यात आले आहे. सुरवातीला प्रायोगिक तत्वावर शहरातील सॅटील पूल, नौपाडा, राम मारुती रोड, तलावपाळी आदि परिसरात ३१० एलईडी दिवे बसविण्यात आले. या ठिकाणी पूर्वी सोडियम व्हेेपरचे दिवे होते. आता त्याच पोलवर एलईडीचे दिवे बसवण्यात आले आहेत. ‘क्लायमॅट ग्रुप’ या संस्थेकडून तांत्रिक सर्वेक्षण करण्यात आले. या पहाणीत एलईडी दिव्यांना किमान ५० टक्के वीज कमी लागत असल्याचे उघड झालेे आहे. त्यामुळे पालिकेने उपवन तलाव, कचराळी तलाव, जवाहरबाग या ठिकाणचे जूने दिवे काढून नवे एलईडी दिवे बसवले आहेत.

दरम्यान केंद्र सरकारच्या अपारंपारिक ऊर्जा विभागाने ठाणे शहराची निवड 'सोलार सिटी' म्हणून केली आहे. गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिका अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत अग्रेसर आहे. पारंपरिक ऊर्जेपेक्षा सौरऊर्जा महागडी ठरत असल्याने त्या ऊर्जानिर्मितीचे प्रमाण कमी होते. नेट मीटरिंगमुळे या ऊर्जानिर्मितीची खर्च कमी झाला आणि वाढत्या वापरामुळे तंत्रज्ञानही स्वस्त होत झाले. त्यामुळेच ठाणे महापालिका पीपीपी तत्त्वावर १० मेगावॉट सौरऊर्जेची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरु केले होते. त्यापैकी उथळसर, माजिवडा आणि वर्तक नगर प्रभाग समिती कार्यालयांवर सोलर पॅनल बसवून वीज निर्मिती सुरु करण्यात आली. तेव्हापासूनच सौरऊर्जेच्या माध्यमातून जास्तीत जास्त वीज निर्मिती आणि वापर करण्याचे नियोजन करण्यास पालिका प्रशासनाने सुरवात केली आणि सोलर प्रकल्प शहरात उभारण्याचे नियोजन केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, अग्निशामन केंद्र, आयुक्त व महापौर बंगला, रुग्णालय या ठिकाणी सुमारे ३६ हजार लिटर क्षमतेचे सोलर वॉटर हिटर बसवण्यात आले. डायघर येथील ५ एकर जागेवर सौर उर्जा पनल उभारल्यानंतर त्याखालील जागेचा वापर स्मार्ट व सोलर सिटी कार्यक्रमासाठी करण्याचे नियोजन होते. याचप्रमाणे शहाड टेमघर जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी दोन मेगावॅट आणि कोपरी मलनिःस्सारण केंद्राच्या ठिकाणी १ मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे प्रस्तावित होते. मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात बऱ्याच जागा सौर ऊर्जा निर्मितीसाठी योग्य नसल्याचे नमूद करत आता फक्त १३०० किलो वॉट निर्मितीचा नवा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, पीपीपी तत्वावर निविदेला मुदतवाढ देण्यासाठी तो आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in