
कोरोनावर उपयुक्त लस उपलब्ध झाल्यानंतर पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. लहान मुलांना कोरोनाचा धोका लक्षात घेता १२ ते १४ तसेच १५ ते १७ वयोगटातील मुलांच्या लसीकरणावर भर देण्यात आला. मात्र या वयोगटातील मुलांनी पाठ फिरवल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
मुलांच्या लसीकरणाला वेग देण्यासाठी आता २१२ लसीकरण केंद्रावर आठवड्यातून एकदा लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. विशेष लसीकरण कॅम्प लावण्यात येणार असून लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी पावले उचलण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
मार्च २०२०मध्ये कोरोनाने शिरकाव झाल्यानंतर कोरोनावर उपयुक्त लस उपलब्ध व्हायला जवळपास वर्षाचा कालावधी लागला. १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली. सद्यस्थितीत सुमारे १५० पालिका, खासगी आणि सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत १८ वर्षांवरील सर्व ९२ लाख ३६ हजार ५०० पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठांना पालिकेच्या माध्यमातून ‘प्रिकॉशन डोस’ही देण्यात येत आहे. तर इतर लाभार्थ्यांना खासगी रुग्णालयात ‘प्रिकॉशन डोस’ घेता येत आहे. मात्र मुलांच्या लसीकरणाला आवश्यक त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून विविध उपायोजना करण्यात येत आहेत. यामध्ये सोसायट्या, झोपडपट्ट्या, खासगी शाळांमध्ये पालिकेच्या माध्यमातून लसीकरण कॅम्प आयोजित केले जात आहेत.