‘खरी’ शिवसेना कोणत्या गटाची आहे, ते निवडणूक आयोगाला ठरवू द्या ; शिंदे गट पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात दाखल

एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने शिवसेनेत उभी फूट पडल्याचा दावा केला जात आहे.
‘खरी’ शिवसेना कोणत्या गटाची आहे, ते निवडणूक आयोगाला ठरवू द्या ; शिंदे गट पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात दाखल

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षावर नेमका अधिकार कोणाचा, असा प्रश्न निर्माण झाला. शिंदे गटाने खरी शिवसेना आणि धनुष्यबाणही आमचाच, असा दावा केला केल्यानंतर त्याला उद्धव ठाकरे यांनीही आव्हान दिल्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आहे. आता शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात नव्याने याचिका दाखल केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावा. तसेच ‘खरी’ शिवसेना कोणत्या गटाची आहे, हे निवडणूक आयोगाला ठरवू द्या, अशी मागणी करणारी याचिका शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने शिवसेनेत उभी फूट पडल्याचा दावा केला जात आहे. आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, शाखाप्रमुख, जिल्हा परिषद अशा प्रत्येक स्तरावर आमच्याकडे जास्त संख्याबळ असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.

तसेच शिवसेनेत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रतिनिधी सभेतील दोन तृतीयांश सदस्य आमच्याकडे असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात तसे घडल्यास उद्धव ठाकरे मोठ्या अडचणीत येऊ शकतात. गेल्या काही दिवसांत भाजपसोबत राजकीय संसार थाटलेल्या एकनाथ शिंदे गटाकडून प्रत्येक कायदेशीर पाऊल पूर्ण वेळ घेऊन आणि काळजीपूर्वक टाकले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार त्यांच्यासोबत फुटून बाहेर निघाले होते; मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ आणि संसदेत आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करत संपूर्ण शिवसेना पक्षावरच आपला दावा सांगितला होता. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण चिन्ह हे आपल्याला मिळावे, अशी विनंती केली होती. शिवसेनेकडूनही निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात कॅव्हिएट दाखल करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in