
राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून पहा, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून विश्रांतीवर असलेले राज ठाकरे आता अॅक्टिव्ह मोडवर आल्याचे पहायला मिळत आहे. हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर आता राज ठाकरे पुन्हा राजकारणाच्या मैदानात उतरले आहेत. सोमवारी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकारिणीच्या बैठक पार पडली. यावेळी सर्जरीपूर्वी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना काही कामं सोपवली होती, त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची निवडणूक रणनीती ठरल्याचीही माहिती आहे. तर, २३ ऑगस्टला राज ठाकरे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधून म्हटले की, लोक सध्याच्या राजकारणाला वैतागले आहेत. त्यामुळे ही अस्थिरता एक संधी आहे, अशा अर्थाने पहा. लोक आपला विचार करत आहेत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सदस्यता नोंदणीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जा, पक्ष संघटन वाढवा, अशा सूचना राज ठाकरे यांनी नेत्यांना दिल्या आहेत.