मुंबई : मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातील संगमवाडी ते मुंबईतील आझाद मैदान अशी दवंडी यात्रा काढून या यात्रेचे आझाद मैदानात महामोर्चात रुपांतर झाले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या महामोर्चाला भेट दिली. मातंग समाजाच्या मागण्या रास्त आहेत, आरक्षण वर्गीकरण, बार्टी स्थापन करण्यासह समाजाच्या सर्व मागण्यांचा सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन या नेत्यांनी दिल्याची माहिती मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.
आझाद मैदानावरील मातंग समाजाचा महामोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव, सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, काँग्रेस आमदार राजु आवळे, आ. जितेश अंतापुरकर, आमदार नामदेव ससाणे, व आमदार विष्णु कसबे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी भेट दिली.
पुणे जिल्ह्यातील संगमवाडी येथील क्रांतिवीर लहुजी साळवे स्मारकापासून ही दवंडी यात्रा काढण्यात आली होती. मातंग समाज २० वर्षांपासून मातंग व इतर वंचित जातींना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी सतत आक्रोश करीत आहेत परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याने समाजामध्ये संतापाची भावना आहे. सरकारने आतातरी समाजाच्या मागण्यांचा सहानुभुतीपूर्वक विचार करावा, असे राजहंस म्हणाले.