कुलाबामध्ये युती-आघाडीमध्ये थेट लढत; राहुल नार्वेकर यांच्यासमोर कॉंग्रेस उमेदवाराचे आव्हान

Maharashtra assembly elections 2024 : कुलाबा विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. एकेकाळी काँग्रेसचा गड राहिलेल्या या मतदारसंघावर भाजपने आपली पकड मजबूत केली आहे. माजी आमदार राज पुरोहित आणि राहुल नार्वेकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजप उमेदवारांचा या मतदारसंघात विजय झाला.
राहुल नार्वेकर, हिरा देवासी (डावीकडून)
राहुल नार्वेकर, हिरा देवासी (डावीकडून)
Published on

तेजस वाघमारे/मुंबई

कुलाबा विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. एकेकाळी काँग्रेसचा गड राहिलेल्या या मतदारसंघावर भाजपने आपली पकड मजबूत केली आहे. माजी आमदार राज पुरोहित आणि राहुल नार्वेकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजप उमेदवारांचा या मतदारसंघात विजय झाला. तिसऱ्यांदा या मतदारसंघात कमळ फुलविण्यासाठी भाजपने राहुल नार्वेकर यांना दुसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. महाविकास आघाडीने काँग्रेसचे हिरा देवासी यांना उमेदवारी दिली असून या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.

राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले मंत्रालय या मतदारसंघात येते. शासकीय आणि खासगी कार्यालयांचे केंद्र असलेल्या या मतदारसंघात नोकरीनिमित्त रोज लाखो लोक येतात. मराठी, गुजराती, मुस्लिम, मागासवर्गीय मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवतात. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या अ‍ॅनी शेखर ३९ हजार ७७९ मते घेत विजयी झाल्या होत्या. तर भाजपाचे राज पुरोहित यांना ३१ हजार ७२२ मते मिळाली होती. मनसेचे अरविंद गावडे यांना २२ हजार ७५६ मते मिळाली होती. २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे राज पुरोहित यांनी काँग्रेसच्या अ‍ॅनी शेखर यांचा पराभव केला. पुरोहित यांना ५२ हजार ६०८ मते मिळाली. तर शिवसेनेचे पांडुरंग सकपाळ यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. सकपाळ यांना २८ हजार ८२१ मते मिळाली. तर अ‍ॅनी शेखर यांना २० हजार ४१० मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बशीर पटेल यांना ५ हजार ९६६ मते मिळाली, तर मनसेचे अरविंद गावडे यांना ५ हजार ४५३ मते मिळाली.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपने राज पुरोहित यांचा पत्ता कट करून त्यांच्याऐवजी राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत नार्वेकर ५७ हजार ४२० मते घेत विजयी झाले. काँग्रेस उमेदवार भाई जगताप यांना ४१ हजार २२५ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे जितेंद्र कांबळे यांना ३ हजार ११ मते मिळाली. यंदाच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने हिरा देवासी यांना उमेदवारी दिली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील मतदारांनी महायुतीच्या बाजूने मतदान केल्याचे दिसते. महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना ५६ हजार ७७८ मते मिळाली, तर आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांना ४७ हजार ६८४ मते मिळाली. त्यामुळे विजयासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत होणार आहे.

मतदारसंघातील समस्या

कोळीवाड्यांचा पुनर्विकास

वाहतूककोंडी

पार्किंगची मोठी समस्या

झोपड्यांचा पुनर्विकास

प्रकल्पांमुळे मच्छीमारांचे होणारे नुकसान

मतदारसंघातील मतदार

पुरुष - १ लाख ५१ हजार १५१

महिला - १ लाख १३ हजार ७७०

तृतीयपंथी - ९

एकूण - २ लाख ६४ हजार ९३१

logo
marathi.freepressjournal.in