माहीममध्ये हायव्होल्टेज लढत; बाळासाहेबांच्या तालमीतील दोन वाघ व अमित ठाकरे यांच्यात टक्कर

माहीम विधानसभा हा मतदारसंघ पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील साक्षीदार असलेले ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदान, शिवसेना भवन यामुळे या विभागाला वेगळे महत्त्व आहे.
सदा सरवणकर, अमित ठाकरे, महेश सावंत (डावीकडून)
सदा सरवणकर, अमित ठाकरे, महेश सावंत (डावीकडून)
Published on

रोहित गुरव / मुंबई

माहीम विधानसभा हा मतदारसंघ पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील साक्षीदार असलेले ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदान, शिवसेना भवन यामुळे या विभागाला वेगळे महत्त्व आहे. वर्ष २०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर प्रथमच होणारी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची आहे. विशेष म्हणजे बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेले सदा सरवणकर आणि महेश सावंत हे दोन उमेदवार आणि मनसेचे अमित ठाकरे अशी तिरंगी हायव्होल्टेज लढत माहीममधून होणार आहे. मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. माजी नगरसेवक संतोष धुरी, संदीप देशपांडे यांच्या कामांची साथ, त्यांचा लोकसंपर्क याची मदत मनसेला मिळण्याची शक्यता आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने शिवसेनेचा हा गड भेदला होता. राज ठाकरे यांची या मतदारसंघात प्रचारार्थ सभा झाली, तर त्याचा मतांवर परिणाम होऊ शकतो. त्यांच्या प्रचार सभा, त्यातील विरोधाचे मुद्दे, कोणाला लक्ष्य केले आहे?, यावर मतांचे गणित बऱ्यापैकी अवलंबून असेल.

शिवसेनेतील बंडानंतर गेल्या दोन वर्षांपासून सदा सरवणकर यांच्या कामांना कमालीचा वेग आला आहे. गेल्या अडीच वर्षांत शिंदे सरकारच्या कामांचा, योजनांचा धडाका त्यांच्या दिमतीला आहे. आधी मुंबई पालिकेत तीन टर्म नगरसेवक आणि विधानसभेत तीन टर्म आमदार असा लोकप्रतिनिधी म्हणून गाढा अनुभव सदा सरवणकर यांच्यापाशी आहे. त्यांच्याकडे वाकचातुर्य नसले तरी राजकीय चापल्य आहे. त्याची झलक वे‌ळोवेळी त्यांनी दाखवून दिली आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांना तिकीट नाकारणे शिवसेनेच्या अंगलट आले होते. त्यानंतर शिवसेना नेतृत्वाने अशी चूक पुन्हा केली नाही.

दरम्यान शिवसेनेत शकले झाल्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. वाढत्या कामांचा अर्थ मतदार राजा जाणतो. शिवाय कधी कधी तो सहानुभूतीकडे झुकतो, तर कधी प्रॅक्टिकली विचार करत मतांनी झोळी भरतो. सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यातील रस्सीखेच ही प्रॅक्टिकली आणि सहानुभूती यावर अवलंबून आहे. शिंदे गटाचे बंड पटले की नाही पटले?, त्यानंतर सदा सरवणकरांच्या कामांना आलेला वेग, महेश सावंत यांच्याबाबत असलेली सहानुभूती आणि त्यांची शिवसेनेबद्दलची निष्ठा यावर कोणाचे पारडे जड होईल त्यावर उमेदवारांचे यशापयश अवलंबून असेल. मतदार राजा बोलत नसला तरी तो मतदानातून आपली निवड उघड करतो. हे याधीही या मतदारसंघाने दाखवून दिले आहे. तुम्ही त्याला गृहीत धरलात तर आपटलातच समजा. २००९ ची विधानसभा निवडणूक याचे ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळे ही तिरंगी लढत हायव्होल्टेज होणार यात शंकाच नाही.

सदा सरवणकर आणि महेश सावंत आमनेसामने

सदा सरवणकर आणि महेश सावंत या दोन्ही उमेदवारांची कर्मभूमी दादर, प्रभादेवीच आहे. सुरुवातीच्या काळात महेश सावंत हे सदा सरवणकर यांचे निकटवर्तीय होते. मात्र २०१७ मध्ये या दोघांमध्ये मतभेद झाले. त्याला राजकीय संघर्षाची किनार आहे. २०१७ च्या मुंबई पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १९४ मधून शिवसेनेच्या तिकिटावर सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेले महेश सावंत हे अपक्ष उमेदवार म्हणून लढले. त्यांनी कडवी झुंज दिली पण अवघ्या २५० मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

मराठी टक्का निर्णायक

शिवसेनेची शकले झाल्यानंतर महेश सावंत यांना विभागप्रमुखपदाचा बोनस मिळाला. कदाचित आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याचे ते संकेत होते. महेश सावंत यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख कार्यकर्ता, शाखाप्रमुख, विभागप्रमुख असा चढता राहिला आहे. सुरुवातीपासूनच त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग होता. तसेच प्रभादेवीत त्यांच्याबद्दल कमालीची सहानुभूती आहे. मात्र त्यांचा प्रभाव असलेला भाग मर्यादित आहे. या मतदारसंघात मराठी टक्का निर्णायक असला तरी माहीम परिसरात मुस्लिमांची मते आहेत. ती महेश सावंत यांना एकगठ्ठा मिळण्याची दाट शक्यता आहे. खासदार खांदेपालटनंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांतील उत्साह दुणावला असला तरी लोकसभेच्या निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील माहीम विधानसभेत शिंदे गटाच्या उमेदवाराने बरी मते मिळवली होती हे विसरून चालणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in