मुंबई : भाजपने मुंबई विकायला काढली आहे. मात्र मुंबई मिळवण्यासाठी मुंबईकरांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे मुंबई विकण्याचा विचार मनात आणू नये आणि शिवसेना आहे तोपर्यंत मुंबई विकू देणार नाही, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रविवारी ठणकावले.
बीकेसीतील एमएमआरडीए मैदानात मविआची जाहीरसभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते. ‘बड्या उद्योगपतीच्या मदतीने शिवसेना फोडली आणि आता नरेंद्र मोदी यांच्यावर ‘बाळासाहेब के नाम पे दे दे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. शिवसेनेशी गद्दारी केली आणि आता निवडणुकीत बाळासाहेबांचे नाव वापरतात. मिंधे मर्दाची अवलाद असशील तर बाळासाहेबांचे नाव न घेता मैदानात ये आणि लोकांचे जोडे खा, अशी सडकून टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने ‘कटेंगे तो बटेंगे’ हा नारा दिला जात आहे. हा असला नारा सोडा, मुंबईवर घाला घातला, तर काटेंगे, असा सज्जड इशारा उद्धव ठाकरे यांनी महायुतीला यावेळी दिला.
महाराष्ट्र कोणत्या दिशेला नेऊन ठेवलाय. मी अडीच वर्षें मुख्यमंत्री असताना सगळे सुरक्षित होते. जर मोदींना तिकडे अनसेफ वाटते असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली.
दिल्लीतील निती आयोग राज्याच्या विकासासाठी सूचना देण्याचे काम करते. मात्र, निती आयोगाच्या माध्यमातून आता मुंबईची ब्लू प्रिंट तयार केली असून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा यांचा डाव आहे. बाळासाहेबांनी सांगितलंय की, मुंबई तोडायची भाषा केली तर सोडायचं नाही, अशी आठवण करुन देत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
“सोयाबीन आणि कापूसची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, मी तुम्हाला चांगला भाव मिळवून देईन, तुम्ही फक्त सरकार बदला. मी काल ठाण्यात जाऊन मिंधेला आव्हान देऊन आलो आहे. आज पुन्हा तुमच्यासमोर मी त्यांना आव्हान देतो, जर हिम्मत असेल तर स्वत:च्या वडिलांचा फोटो लावून प्रचार कर. मी मुख्यमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये टाकले. राष्ट्रपुरुषांच्या यादीत कोणत्याही व्यक्तीचे नाव आले तर त्याचे फोटो आणि नाव कोणीही वापरू शकतो म्हणून हे लुटारू, गद्दार, मिंधे माझ्या वडिलांचे नाव वापरत आहेत,” असे सांगून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.
पंकजाताईंना धन्यवाद
चंद्रचूड यांनी न्यायदेवतेची पट्टी काढली, तशी तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली. पंकजा ताई म्हणाल्या की, भाजपचे काम खूप भारी आहे. महाराष्ट्रात ९० हजार बुथ आहेत. प्रत्येक बुथवर भाजपचे दक्षता पथक आहे. या पथकात जर दोन माणसे असतील तर त्यांची संख्या १ लाख ८० हजार होते. जर दोनपेक्षा जास्त लोक असतील तर त्या पटीत त्यांची संख्या वाढेल. ही सर्व लोक भाजपने गुजरातमधून आणली आहेत. भाजपने ही माणसे आपल्यावर नजर ठेवायला आणली आहेत. उद्या यांचा आपली मुंबई आणि महाराष्ट्र बळकविण्याचा डाव आहे. हे तर आता फेक नरेटिव्ह नाही ना. कारण हे मी पंकजा मुंडे बोलल्यानंतर बोलत आहे. याचा अर्थ भाजप इथे पराभूत झालेली आहे. त्यांचे लोक इथे राहिलेले नाहीत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राहिलेल्या भाजपप्रेमींवर भाजपचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच त्यांना परराज्यातून माणसे आणून नजर ठेवावी लागत आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
कलम ३७० वरुन मोदी, शहांना टोला!
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवला त्याचे स्वागत करतो. पण आजही तेथील महिला असुरक्षित आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीर पंडितांना सांगितले होते की तुम्ही रहा, मी आहे. त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा कोण हे माहीत नव्हते, असा टोला त्यांनी लगावला.
धारावीकरांना आहे तिथेच घर
बड्या उद्योगपतीच्या नावाखाली धारावी बळकवण्याचा डाव भाजप महायुतीचा असून, राज्यात मविआचे सरकार सत्तेत येताच धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करणार आणि धारावीकरांना आहे तिथेच घर देणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच आवश्यक्ता भासल्यास ‘एमएमआरडीए’बरोबरचे करार रद्द करू, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना चिमटा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांची आठवण झाली आणि १५०० रुपये ‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत देण्याची घाई केली. बदलापूरमध्ये चिमुकल्यावर अत्याचार झाला त्या पीडित कुटुंबांना मदत करा. देवाभाऊ, जॅकेट भाऊ, दाढी भाऊ, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लगावला.