चमत्कार कसा घडेल, हे उभा महाराष्ट्र सोमवारी पाहिलच;अजित पवार

निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.
 चमत्कार कसा घडेल, हे उभा महाराष्ट्र सोमवारी पाहिलच;अजित पवार

विधानपरिषद निवडणुकीत चमत्कार होईल की नाही आणि चमत्कार कसा घडेल, हे उभा महाराष्ट्र सोमवारी पाहिलच, असे सूचक वक्तव्य करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना विधान परिषद निवडणुकीबाबत भाष्य केले. ‘आमचा एवढ्या वर्षाचा अनुभव लक्षात घेता आम्हाला थोडीशी मते तरी मिळतील ना’, असा टोलाही अजित पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात लगावला.

विधानपरिषद निवडणुकीत आम्ही सगळेजण मनापासून प्रयत्न करत आहोत. सेनेकडे दोन उमेदवार निवडून आणू शकतात एवढी मते आहेत. आमच्या दोघांना न्यायालयाने परवानगी दिली नाही त्यामुळे आमच्याकडे ५१ आमदारांची संख्या आहे. एखादे मत राज्यसभेसारखे बाद ठरवले जाऊ शकते, त्यामुळे ती खबरदारी घेतली जात आहे. कोटा जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सेनेचे दोन्ही उमेदवार व्यवस्थित निवडून येतील. शिवसेनेने अपक्ष आमदारांना मंत्री केले आहेत ते सेनेकडेच जातील. एक - दोन आकडे आमच्या उमेदवारांना घेतले तर तीन - चार आकडे कुणाला द्यायचे हे ठरायचे आहे. महाविकास आघाडीत एकजूट असून अपक्षांना आम्ही फोन केला होता. त्याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली होती. ज्यांना फोन केला होता त्यांनी मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे आम्ही मतदान करु असे सांगितले आहे, असेही अजित पवार म्हणाले.

आमदार निवडून देत असताना आपापला कोटा आहे. परंतु, आम्हाला संख्या कमी पडतेय त्याचे नियोजन सुरू आहे. बविआच्या नेत्यांना सर्वचजण जाऊन भेटले आहेत. मात्र, स्वतंत्र विचाराचे लोक आहेत त्यांना कोण भेटत असतील आणि मतदान करा, असे सांगत असतील तर त्यात चुकीचे काही नाही. आता मतदानाला आमदारांची संख्या २८४ राहिली तर २६ चा कोटा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदस‌द‌‌विवेकबुद्धीचे स्मरण करून अधिकृत उमेदवाराला मत मिळेल व विरोधकांनीही सदसदविवेकबुद्धीचे स्मरण करत आम्हालाच मत द्यावे, असेही अजित पवार म्हणाले. ‘अग्निपथ’वरुन अनेक राज्यात तरुण रस्त्यावर उतरून जाळपोळ करत आहेत. ही योजना जाहीर करताना केंद्राने वयाचा निर्णय घेतला नव्हता. मात्र, तरुणांचा संताप लक्षात घेता वयाच्या अटीमध्ये केंद्र सरकारने बदल केला आहे. हा निर्णय केंद्र सरकारने अगोदरच घ्यायला हवा होता, म्हणजे हा रोष वाढला नसता, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

दरम्यान, तरुणांनी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करु नये. कोरोना काळात अनेक रोजगार गेले आहेत, त्यामुळे तरुणांच्या भावना आम्ही समजतो, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in